इराण युद्धाचा महाराष्ट्र, मुंबईला फटका; राज्यातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार नेमकं काय करणार? सुनील प्रभू यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि परिसरातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या जनजीवनावर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मुंबईत घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, या गंभीर प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला.

सभागृहात बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, इराणमधील युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईत घरगुती वापराच्या सिलिंडरसोबतच हॉटेल आणि इतर व्यवसायांसाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठाही मोठ्या प्रमाणावर घटला आहे. “लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आम्हाला सतत जनतेचे फोन येत आहेत, गॅस कधी मिळणार? अशी विचारणा लोक करत आहेत,” असे प्रभू यांनी नमूद केले.

यावेळी आक्रमक पवित्रा घेत सुनील प्रभू यांनी सरकारला विचारले की, या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार नेमकी काय पावले उचलत आहे? “हे सरकार नेमकं काय करणार आहे, हे लोकांना कळू द्या. जनतेला वाऱ्यावर सोडून चालणार नाही,” असे सांगत त्यांनी संबंधित मंत्र्यांनी यावर तातडीने उत्तर देण्याची मागणी केली.

Comments are closed.