मलनिस्सारण आणि जलवाहिन्या बदलण्यासाठी तातडीने निधीची गरज, सुनील राऊतांनी मांडल्या विक्रोळीतील समस्या

विक्रोळीतील टागोर नगर आणि कन्नमवार नगरमधील मलनिस्सारण आणि जलवाहिन्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मलनिस्सारण वाहिन्यांमधील सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही वाहिन्यांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी आज विधानसभेत केली.

नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेत भाग घेताना सुनील राऊत यांनी विक्रोळी पूर्व भागातील समस्या मांडल्या. टागोर नगर व कन्नमवार नगरमध्ये साठ वर्षांपूर्वीच्या जलवाहिन्या व मलनिस्सारण वाहिन्या आहेत. त्यावेळी बैठय़ा चाळी असल्यामुळे त्याप्रमाणे या वाहिन्यांची रचना होती, पण आता चाळींचा पुनर्विकास होऊन नागरिकरण वाढल्याने मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याची गरज आहे. पावसाळय़ात सांडपाणी रस्त्यावर येते. दुर्गंधी पसरते. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. जुन्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होतो. संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार, बैठका व विधानसभेत आवाज उठवूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. या मलनिस्सारण व जलवाहिन्या वाहिन्या त्वरित बदलण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

सूर्यानगर ही वस्ती डोंगराळ भागावर वसलेली आहे. परिणामी रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. सूर्यानगरसाठी जलकुंभ बांधण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

यावेळी त्यांनी इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्नही मांडला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार 50 मीटर बफरझोन बाधित इमारतींना सीआरझेड दोनमध्ये वर्गीकरण करून पुनर्विकासासाठी परवानगी देण्याची मागणी केली. कन्नमवार नगर व टागोर नगरमधील वंचित इमारतींना व्ही.पी. कोटा व प्रोरेटा मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याची मागणी केली.

रस्त्यांची अवस्था दयनीय

या विभागातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे त्यांनी यावेळी सभागृहाचे लक्ष वेधले. या भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळय़ात नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागते. अधिकारी फक्त पाहणी करतात आणि चौकशी पलीकडे प्रत्यक्षात रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नाही. यावेळी त्यांनी विविध रस्त्यांच्या नावाची यादीच सादर केली.

निधी देण्याची मागणी

भांडुप पूर्व येथील जय अंबेनगर येथील साठ वर्षांपूर्वीचा तुटलेल्या साकवावरून जाताना विद्यार्थी व रहिवाशांची गैरसोय होते. पालिकेच्या अभियंत्यांकडे पत्रव्यवहार करूनही निधी दिलेला नाही.

Comments are closed.