गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या, विधानपरिषदेत सुनील शिंदे यांची मागणी

गिरणी कामगारांना मुंबईबाहेर न पाठवता मुंबईतील एनटीसी महामंडळाच्या गिरण्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी विधानपरिषदेत केली आहे.

विधानपरिषदेत याच मुद्द्यावर बोलताना सुनील शिंदे म्हणाले आहेत की, “गिरणी कामगारांना मुंबई बाहेर न पाठवता मुंबईतील एनटीसी महामंडळाच्या अखत्यारीतील गिरण्यांच्या जमिनीवर घेऊन गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावी.” ते म्हणाले, गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडामार्फत बांधण्यात आलेल्या 13453 व मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून 2517 असे एकूण 15870 घरकुलांचे गिरणी कामगारांना वाटप करण्यात आले आहे. म्हाडा आणि कामगार विभागाने घेतलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत एक लाख 1300 हजार इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. मुंबईत स्वाहान मिल, अपोलो मिल, एल्फिन्स्टन मिल, अशा बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागांवर कामगारांना घरे देण्यात आलेले आहेत.

सुनील शिंदे म्हणाले, “गिरणी कामगारांच्या घरासाठी मुंबईत जागा शिल्लक नसल्याचे 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या असलेल्या हजारो गिरणी कामगारांना मुंबई बाहेर 30000 आणि वांगणी येथे 51000 घरे देण्याचे प्रस्तावित आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो गिरणी कामगार मुंबई बाहेर फेकले जाणार आहेत. मुंबईत एनटीसीच्या 24 गिरण्यांपैकी 11 गिरण्यांकडून कामगारांना घरांसाठी जागा मिळालेल्या नाही. संबंधित गिरण्यांच्या ताब्यात सुमारे 121 एकर जमीन आहे. सदर गिरण्या बंद असल्या तरी कामगार आयुक्तांनी संबंधित गिरण्यांकडे नो इशू प्रमाणपत्र नसल्याने 15 ओ खाली गिरण्या बंद करण्यास परवानगी दिलेली नाही. अशा प्रकारे गिरणी कामगारांच्या घरांसाठी जागा देणे त्यांनी टाळले आहे. यातच गिरणी कामगारांना मुंबई बाहेर न पाठवता मुंबईतील राष्ट्र वस्त्र उद्योग महामंडळाच्या गिरण्यांची जमीन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कामगारांसाठी घरे उभारण्यात यावीत.”

Comments are closed.