कोट्यवधींच्या कर्जात बुडाला होता सनी देओल; गदर- 2 चित्रपटाने नशीब बदललं

बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल सध्या ‘गदर 2’च्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, या यशापूर्वीचा काळ सनीसाठी खडतर होता. एके काळी त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. अनेक चित्रपट अपयशी ठरले होते आणि करिअरमध्येही मोठा संघर्ष सुरू होता. मात्र, या कठीण काळातही आपण आनंदी होतो, असे सनी देओलने सांगितले आहे.

आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार अलीकडेच सनी देओलने आपल्या करिअरमधील चढ-उतारांबद्दल मोकळेपणाने भाष्य केले. ‘गदर 2’च्या यशामुळे त्याला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. सनी देओलने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 2001 मध्ये ‘गदर’ आणि ‘इंडियन’ यांसारखे चित्रपट यशस्वी झाल्यानंतरही त्याला अपेक्षित काम मिळाले नाही. दोन्ही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले होते. मात्र, त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल झाले आणि सनीला योग्य विषय तसेच योग्य चित्रपट निर्माते मिळत गेले नाहीत. त्यामुळे त्याच्या करिअरवरही त्याचा परिणाम झाला.

याच काळात त्याचा ‘जो बोले सोनिहाल’ हा चित्रपटही वादात सापडला. चित्रपटांच्या अपयशामुळे आर्थिक अडचणी वाढत गेल्या आणि सनीवर मोठे कर्ज झाले. दरम्यान, 2023 मध्ये ‘गदर 2’ प्रदर्शित होण्याच्या काही काळ आधी सनी देओलच्या आर्थिक अडचणींची चर्चा झाली होती.

‘गदर 2’च्या यशानंतर लगेचच एका बँकेने मुंबईतील जुहू येथील सनीच्या ‘सनी व्हिला’ या मालमत्तेसाठी ई-लिलावाची नोटीस जारी केली होती. बँकेच्या माहितीनुसार, सनी देओलवर व्याजासह सुमारे 55.99 कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र, सनीने रक्कम परत करण्याची तयारी दर्शवल्यानंतर ही नोटीस नंतर मागे घेण्यात आली.

सनीने 2016 मध्ये ‘घायल रिटर्न्स’ या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी कर्ज घेतल्याचे सांगितले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच त्याने त्यात अभिनयही केला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. यानंतर सनीने मुलगा करण देओलला ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यामुळे सनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

या सर्व अडचणींनंतर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ने मात्र सनी देओलचे नशीबच बदलून टाकले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि सनीला पुन्हा एकदा सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला. त्यामुळे ‘गदर 2’ हा चित्रपट केवळ सनीच्या करिअरमधील कमबॅक नव्हते, तर त्याच्या आयुष्यातील आर्थिक आणि व्यावसायिक संकटातून बाहेर पडण्यासाठीही महत्त्वाचा टप्पा ठरला.

Comments are closed.