सनरायझर्स हैदराबादच्या नावावर नकोसा विक्रम; आयपीएल इतिहासात चौथ्यांदाच घडली 'अशी' घटना
सनरायझर्स हैदराबादचा संघ आपल्या घरच्या मैदानावर लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्ध सामना खेळत आहे. या सामन्यात हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली, पण सर्वांना त्यांच्याकडून ज्या कामगिरीची अपेक्षा होती, तसे अजिबात पाहायला मिळाले नाही. लखनऊविरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ९ गडी गमावून १५६ धावा केल्या. एका क्षणी तर एवढ्या धावा करणेही कठीण दिसत होते. आपल्या या खराब कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ अशा एका नकोशा यादीत सामील झाला आहे, ज्याची त्यांनी स्वतःही कधी अपेक्षा केली नसेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या गेल्या काही सीझन्समध्ये सनरायझर्स हैदराबादची गणना धोकादायक संघांमध्ये केली जाते. त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे आक्रमक फलंदाज आहेत जे आपल्या जोरावर संपूर्ण सामन्याचे चित्र पालटू शकतात. मात्र, लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पहिल्या १० षटकांत केवळ ३५ धावाच करू शकला. आयपीएलच्या इतिहासात असे केवळ चौथ्यांदा घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने फलंदाजी करताना पहिल्या १० षटकांत ३५ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्या आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ असून त्यांनी २००९ च्या आयपीएल सीझनमध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध पहिल्या १० षटकांत ३१ धावा केल्या होत्या.
लखनऊ सुपर जाएंट्सविरुद्धच्या सामन्यात एका वेळी सनरायझर्स हैदराबादला १०० धावांचा टप्पा ओलांडणेही कठीण वाटत होते. परंतु, हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी ६३ चेंडूत ११६ धावांची भागीदारी केली आणि संघाला १५० धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याचसह, आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पाचव्या किंवा त्याखालील विकेटसाठी झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
Comments are closed.