वरळीत 22 वेळा वार करून सुपरवायझरची निर्घृण हत्या; तिघांना अटक, एक अल्पवयीन

काकाला कामावरून काढून टाकले, शिवाय आपलेही वेतन दिले नाही म्हणून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. रागाच्या भरात त्याने अन्य दोघांना सोबत घेऊन सुपरवायझरला एकटय़ाला गाठले आणि सोबत आणलेल्या चाकूने 22 वार करून त्याची निर्घृण हत्या केली. वरळी येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

वरळीच्या कांबळे नगरात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रकल्प सुरू आहे. मोहम्मद शब्बीर अब्बास खान (38) हे तिथे सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांनी मुख्य आरोपी सुधांशू कांबळे यांच्या काकाला कामावरून काढले होते. शिवाय सुधांशूचे वेतनदेखील दिले नव्हते. यामुळे सुधांशू संतापलेला होता. अखेर त्याने टोकाची भूमिका घेत अन्य दोघांना सोबत घेऊन बुधवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास शब्बीर खान याला साईटवर गाठले आणि सोबत आणलेल्या चाकूने सपासप वार केले. परिणामी शब्बीर जागीच रक्ताच्या थारोळय़ात पडला. त्याला इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हा प्रकार कळताच वरळी पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून सुधांशू कांबळे (19), साहिल मराठी (18) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला पकडले. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेले दोन चाकू हस्तगत करण्यात आले आहेत.

Comments are closed.