व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पाच दिवसांनंतर पुन्हा सुरू होतो.

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने 5 दिवसांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरील बंदी उठवली आहे. सर्व 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे वितरण पुन्हा सुरू झाल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले. सरकारने 9 मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती. घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही गॅस सिलिंडरचा पुरवठा येत्या काही दिवसात पूर्णपणे सुरळितपणे सुरू होणार असल्याने ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, सिलिंडरचा काळाबाजार आणि बेकायदेशीर साठा रोखण्यासाठी देशभरात छापे टाकण्यात येत आहेत.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी शनिवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गॅस वितरण प्रणालीतील अपडेट्सची इत्यंभूत माहिती दिली. होर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या जहाजांमधून सध्या आवश्यक असलेला एलपीजी गॅस पुरवठा होत असल्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गॅस सिलिंडरसाठी बुकिंग केल्यानंतर काही दिवस विलंब होत असला तरी ग्राहकांनी संयम बाळगावा असे त्यांनी म्हटले आहे. दिल्ली-एनसीआरमधील उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आस्थापनांना एका महिन्यासाठी नैसर्गिक वायूऐवजी बायोमास पेलेट्स, विशेषत: रिफ्यूज डेरिव्ह्ड फ्युएल (आरडीएफ) पेलेट्स तात्पुरते वापरण्याची परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.