प्रदूषणाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्ली आणि देशातील अन्य मोठ्या शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषण सर्वात मोठी समस्या आहे. विषारी हवेमुळे लोकांच आरोग्य संकटात सापडले आहे. लहान मुलांपासून वृद्ध आजारी पडत असल्याचे चित्र आहे. याचदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारसमोर मोठा प्रस्ताव मांडला आहे. या मुद्द्यावर विरोधी पक्ष सरकारसोबत कुठलाही आरोप-प्रत्यारोप न करता काम करण्यास तयार आहे. सत्तापक्ष-विरोधी पक्ष सहमत असतील असे मुद्दे कमीच असतात आणि या मुद्द्यावर संघर्षाची आवश्यकता नसल्याचे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत. राहुल गांधींनी शून्यप्रहरात देशातील मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण आणि यामुळे लोकांना होत असलेल्या आरोग्य समस्यांचा उल्लेख केला आहे. तसेच सरकार आणि विरोधी पक्षाने या मुद्द्यावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. सत्तापक्ष-विरोधी पक्ष परस्परांवर या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप करणार नाहीत तर उपाय शोधतील असे राहुल यांनी म्हटले आहे.
आमची बहुतांश मोठी शहरे विषारी हवेने झाकोळून गेली आहेत. लाखो मुलांना फुफ्फुसांशी निगडित आजार होत आहेत. त्यांचे भविष्य संकटात सापडत आहे. लोकांना कॅन्सर होत असून वृद्धांना श्वसनासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारकडे पुढील 4-5 वर्षांचा रोडमॅप आहे का असा प्रश्नही राहुल यांनी विचारला आहे.
उपाययोजनांवर भर
तुम्ही काय केले असे आम्ही म्हणणार नाही, तसेच सत्तापक्षाने देखील आम्ही काय केले असे न म्हणता चर्चा पुढे नेण्याची गरज आहे. भविष्यात भारताच्या जनतेसाठी काय करणार आहोत, कोणती पावले उचलणार आहोत यावर थेट लक्ष देण्याची गरज आहे. याचमुळे परस्परांवर दोषारोपण करण्याऐवजी भारताच्या जनतेच्या भविष्याविषयी बोलुया असे म्हणण्याची गरज असल्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.
सरकारही चर्चेसाठीत तयार
हा वैचारिक मुद्दा नाही. या सभागृहात उपस्थित सर्व लोक वायू प्रदुषणामुळे लोकांना होत असलेल्या नुकसानीवर सहमत असतील. या विषयावर आम्ही सहकार्य करू इच्छितो. पंतप्रधान वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी एक योजना मांडू शकतात असे राहुल गांधींनी सुचविले. यावर संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी सरकार यावर चर्चेसाठी तयार असून संसदीय समिती वेळ निश्चित करू शकते असे सांगितले आहे.
देशाला दाखवून देऊ
प्रदूषणाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र काम करू शकतो हे आम्ही देशाला दाखवून देऊ असे राहुल गांधींनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. दिल्ली आणि मोठ्या शहरांची समस्या मी मांडली आहे. वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्व पक्ष सहमत होऊ शकतात, या मुद्द्यावर आम्ही चर्चा करावी असा सल्ला मी दिला आहे. सर्वसाधारणपणे संसदेत आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु या मुद्द्यावर एकमत असायला हवे, आम्ही भविष्याबद्दल चर्चा करू. ही समस्या कशी दूर करता येईल यावर आम्ही मतप्रदर्शन करू. तज्ञांचे मतही आम्ही जाणून घेणार आहोत. प्रदूषणाच्या समस्येवर आम्ही एकत्रित काम करू शकतो हे आम्ही देशाला दाखवून देणार आहोत असे उद्गार राहुल गांधी यांनी काढले आहेत.
Comments are closed.