सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला आहे.

मानहानी प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला स्थगिती

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या कथित मानहानीकारक वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. महाराष्ट्रातील कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणातील पुढील कार्यवाहीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

न्यायाधीश विक्रम नाथ आणि अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र सरकार आणि तक्रारदार एम.एच. श्रीमल यांना नोटीस बजावून 4 आठवड्यात उत्तर मागविले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी 8 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांना बजावण्यात आलेला समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. त्या आदेशाला राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या निर्णयांचा उल्लेख केला. या प्रकरणात कायदा पूर्वीपासून निश्चित असल्याच सिंघवी यांनी म्हटले. यानंतर खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी निश्चित केली आहे. राहुल गांधी यांनी 20 सप्टेंबर 2018 रोजी राजस्थानमधील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मानहानीकारक वक्तव्य केले होते अशी तक्रार आहे.

वादाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी

निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून राहुल गांधी यांनी अलिकडेच प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मानहानीच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश चर्चेत आला आहे.

Comments are closed.