सुप्रीम कोर्टाने बाल अपहरण प्रकरणाची दखल घेतली
चौकशीसाठी एकसारख्या व्यवस्थेची याचिकेद्वारे मागणी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मुले बेपत्ता होणे आणि त्यांच्या अपहरणाच्या प्रकरणांच्या चौकशीवरून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत पूर्ण देशात अशाप्रकारच्या घटनांच्या चौकशीसाठी एकसारखी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर चौकशी कालमर्यादेत पूर्ण करणे, विशेशा चौकशी प्रक्रिया अवलंबिणे आणि प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी समर्पित न्यायालये स्थापन करण्याची मागणी देखील आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याप्रकरणी केंद्र अन् राज्य सरकारांकडून उत्तर मागविले आहे. खंडपीठाने केंद्र सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत शिक्षण मंत्रालय, कायदा-न्याय मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कायदा आयोगाला नोटीस जारी केली आहे. ही जनहित याचिका अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केली आहे. मुलांच्या अपहरणांच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी पूर्ण देशात एकसमान व्यवस्था असावी, यात खासकरून कालबद्ध चौकशी आणि विशेष चौकशी प्रक्रियेची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
वर्तमान प्रणाली
बेपत्ता, अपहृत आणि बळजबरीने पळवून नेणाऱ्या मुलांशी निगडित प्रकरणांना हाताळणाऱ्या व्यवस्थेतील त्रुटींचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. याचिकाकत्याने सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यास अशाप्रकरणांमध्ये तपास यंत्रणा जलद आणि परस्पर ताळमेळ राखत कारवाई करतील असा दावा केला आहे.
Comments are closed.