सुप्रिमो चषकाचा 9 एप्रिलपासून थरार, एअर इंडिया मैदानावर रंगणार टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप; 65 संघांनी केली नोंदणी

सांताक्रुझच्या एअर इंडिया ग्राऊंडवर पाच दिवस चालणाऱ्या टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप सुप्रिमो चषकाचा थरार बुधवार, 9 एप्रिलपासून पाहायला मिळणार आहे. 9 ते 13 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नॉक आऊट क्रिकेट स्पर्धेसाठी आतापर्यंत 65 संघांनी नोंदणी केली असून त्यामधून 16 संघांची निवड स्पर्धेतील सहभागासाठी केली जाणार आहे. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंबरोबर श्रीलंकेचे खेळाडूही सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस यांनी सुप्रिमो चषकाचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे 11 वे वर्ष आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. बाळासाहेबांना सुप्रिमो म्हणत असत. त्यामुळे या स्पर्धेचे नावही सुप्रिमो चषक ठेवण्यात आले. आठ ओव्हरचे हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्येही मोठी उत्सुकता आहे. स्पर्धेला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून दररोज तीन सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेसाठी आतापर्यंत दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजकोट, केरळ, सिंधुदुर्ग, नागपूर, पुणे, रायगड, पालघर, भिवंडी अशा राज्य आणि जिल्हा पातळीवर संघांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत स्पर्धेसाठी पात्र अंतिम 16 संघांची घोषणा सुप्रिमो चषक समितीकडून केली जाणार आहे. स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि एअर इंडियाने मोलाचे सहकार्य केले आहे.

रतन टाटा यांनीही दिले होते प्रोत्साहन

सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक दिवंगत रतन टाटा यांनीही 2017 साली स्पर्धेला प्रत्यक्ष हजेरी लावून नवोदित क्रिकेटपटूंना टेनिस स्पर्धेतून दिल्या जाणाऱया प्रोत्साहनाबद्दल आयोजक अनिल परब आणि संजय पोतनीस यांचे काwतुक केले होते. यावेळी शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे आणि क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरही उपस्थित होते. उद्योग-व्यवसाय आणि सामाजिक कार्यात व्यस्त असतानाही वेगळय़ा पद्धतीने खेळल्या जाणाऱया या स्पर्धेसाठी रतन टाटा तब्बल दोन तास उपस्थित होते. तो क्षण संस्मरणीय ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.

देशभरासह आता जगभरातही सुप्रिमो चषकाचा डंका वाजू लागला आहे. सुप्रिमो चषकात खेळण्याचे स्वप्न इतर टेनिस खेळाडूही पाहू लागले आहे. स्पर्धेला दरवर्षी मिळणारा प्रतिसाद वाढतच असून देशभरासह जागतिक स्तरावरही ही स्पर्धा आपली ओळख निर्माण करेल अशी आशा आहे. – संजय पोतनीस, आयोजक

संघ, खेळाडूंवर लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव

विजेत्या-उपविजेत्या संघांसाठी लाखोंची बंपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या संघाला 12 लाख, 11 बाईक्स तर उपविजेत्या संघाला 10 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाला प्रत्येकी एक बाईक तर ‘मॅन ऑफ द सिरीज’ जिंकणाऱया खेळाडूला मारुती कार दिली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सहभागी खेळाडूला सन्मानचिन्ह आणि किट बॅग देण्यात येणार आहे.

प्रेक्षकांची संख्या लाखोंच्या घरात

एअर इंडिया मैदानावर प्रत्यक्ष 15 हजार प्रेक्षक दरदिवशी हा थरार पाहणार आहेत. गेल्या वर्षी प्रत्यक्ष मैदानातील प्रेक्षकांसह ‘फेसबुक’, ‘यूटय़ूब’, ‘केबल’’ अशा सोशल मीडियावर तब्बल 24 लाख लोकांनी देशभरातून या स्पर्धेला हजेरी लावली होती. स्पर्धेचे समालोचक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करण्यात येत असल्यामुळे या वर्षी हा आकडा आणखी वाढेल, असा अंदाज आहे.

Comments are closed.