राज्यात CBSE पॅटर्न आणून SSC बोर्ड संपवण्याचा डाव, सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

राज्यात सीबीएसई (CBSE) पॅटर्न आणून एसएससी (SSC) बोर्ड बंद करण्याचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. यामुळे संत, सुधारक आणि शिक्षणाची परंपरा पुसण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. फेसबुकवर एक पोस्ट करत त्या असं म्हणाल्या आहेत.
फेसबुकवर पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री महोदयांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली. राज्याला अतिशय उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. पण तिच्याकडे दुर्लक्ष करुन इतर बोर्डाचे अनुकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला ही अतिशय खेदजनक बाब आहे. या माध्यमातून राज्याचा एसएससी बोर्ड पुर्णतः बंद करण्याचा डाव या सरकारने आखला आहे. असे दिसते. संत, सुधारक आणि शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची ओळख या निर्णयामुळे पुसणार तर नाही ना, अशी शंका वाटते. हा निर्णय अभिजात भाषा मराठी, संस्कृती आणि परंपरेला मारक ठरणार आहे. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, कृपया आपण या निर्णयाचा फेरविचार करावा.”
Comments are closed.