सर्वच विकाऊ नसतात… निष्ठावान सूरजचा अभिमान! उद्धव ठाकरे यांचे कौतुकोद्गार

शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांची  तेरा महिन्यांनंतर आज जामिनावर सुटका झाली. आर्थर रोड तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सूरज चव्हाण यांनी कुटुंबीयांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची गळाभेटही घेतली. सर्वच विकाऊ आणि गद्दार नसतात हे सूरजसारख्या सच्चा, कडवट, निष्ठावान शिवसैनिकाने दाखवून दिले, सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांचा शिवसेनेला अभिमान आहे, असे कौतुकोद्गार यावेळी उद्धव ठाकरे यांनी काढले.

सूरज चव्हाण आज सुटणार हे समजल्यानंतर आर्थर रोड तुरुंगाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चव्हाण यांचे आई, वडील, पत्नी आणि दोन मुलेही उपस्थित होती. सूरज चव्हाण ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचताच आदित्य ठाकरे त्यांना भेटण्यासाठी आले.  चव्हाण यांनी त्यांची गळाभेट घेतली. यावेळी ते गहिवरले होते. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी सूरज यांचे औक्षण करून स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी सूरज चव्हाण व कुटुंबीयांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘आज सूरज चव्हाण यांच्या मुलाचा वाढदिवस आहे. मुलाच्या वाढदिवशी त्याचे वडील घरी आले आहेत. आज खूप आनंदाचा क्षण आहे. सूरज आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शिवसेनेला अभिमान आहे. खरंच एक निष्ठावान शिवसैनिक कसा असायला हवा, त्याचे एक उत्तम उदाहरण सूरजने सर्वांसमोर ठेवले आहे. सर्वच लोक विकाऊ किंवा गद्दार होऊ शकत नाही, हे एका कडवट, कट्टर आणि सच्चा शिवसैनिकाने दाखवून दिले आहे,’’ अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी शिवसेना नेते अ‍ॅड. अनिल परब, उपनेते अमोल कीर्तिकर, विशाखा राऊत, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर उपस्थित होते.

हा आमचा लढणारा वाघः आदित्य ठाकरे

अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरुन दिलं त्यांच्याच वडीलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करून निर्लज्जपणे मंत्रीपदं मिळवली आणि पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुस्रया बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ… सूरज!..अशी एक्स पोस्ट करत शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लढाऊ बाण्याने संकटाला सामोरे जाणाऱ्या सूरज चव्हाण यांचे कौतुक केले.

Comments are closed.