Suresh Dhas clarified his opinion by saying that he will not apologize to Prajakta Mali PPK
आमदार सुरेश धस यांनी केलेल्या विधानामुळे संतप्त झालेल्या प्राजक्ता माळीने त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. परंतु, मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, मी माफी मागणार नाही, असे धस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
बीड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. परंतु, या प्रकरणात अचानकपणे भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले. ज्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागलेले आहे. आमदार धस यांनी शुक्रवारी (ता. 27 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले. ज्यानंतर संतापलेल्या प्राजक्ताने आज शनिवारी (ता. 28 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत आमदार धस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. धस यांनी ज्याप्रमाणे जाहीरपणे माझे नाव घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी जाहीरपणे माझी मागावी, अशी मागणी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केली. पण “मी काही चुकीचं बोललेलो नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही,” असे आमदार धस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Suresh Dhas clarified his opinion by saying that he will not apologize to Prajakta Mali)
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर याबाबत धस यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत म्हटले की, मी कुठेही बोलताना घसरलेलो नाही. त्यामुळे त्यांनी (प्राजक्ता माळी) माझा निषेध केला, याबाबत मला असे वाटते की, त्यांनी माझे विधान पुन्हा एकदा ऐकावे. त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखी कोणतीही बाब मी बोललेलो नाही. तर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून लक्ष विचलीत करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे यापुढे मला कोणीही हा प्रश्न विचारू नका. माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे, असे आमदार सुरेश धस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
– Advertisement –
हेही वाचा… Prajakta Mali : सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…; काय म्हणाली प्राजक्ता माळी?
तसेच, त्यांचा गैरसमज त्यांनी म्हणजेच प्राजक्ता माळी यांनी स्वतः दूर करावा. कारण राजकारणात त्यांना खेचण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचे आणि माझे काही वैर नाही. माझी आणि त्यांची कोणतीही ओळख नाही. पण मी त्यांचा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम पाहात असतो. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर त्यांचा निषेध म्हणून मी हास्यजत्रा पाहणे बंद करतो, असा मिश्किल टोला आमदार धस यांनी लगावला. तर, मी माफी वगैरे काही मागणार नाही. हा विषय प्रसार माध्यमांनी सुद्धा जास्त वाढवू नये, हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे, असेही आमदार सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांसमोर स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे याबाबत आता अभिनेत्री प्राजक्ता माळी या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन किंवा कायदेशीर मार्गाने कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.