सुरेश रैना, शिखर धवन यांची ११ कोटींची संपत्ती जप्त
सट्टेबाजी अॅप प्रकरणात ईडीची कारवाई : युवराज सिंग, सोनू सूद यांचीही या प्रकरणात यापूर्वी चौकशी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याशी संबंधित 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर मनी लाँड्रिंग प्रकरणात जप्तीची कारवाई केली आहे. सट्टेबाजी अॅपशी संबंधित प्रकरणात ईडीने दोन्ही माजी क्रिकेटपटूंविरुद्ध ही कारवाई केली आहे. ऑनलाईन सट्टेबाजी अॅप ‘वनएक्सबेट’च्या जाहिरातीसंदर्भात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रैनाच्या नावावर असलेली 6.64 कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि धवनची 4.5 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
काही सेलिब्रिटींनी ‘वनएक्सबेट’ अॅपमधून मिळालेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध प्रकारच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. ही गुंतवणूक गुन्हा मानली जाते. ईडीने सप्टेंबरमध्ये ‘वनएक्सबेट’ अॅप प्रकरणात क्रिकेटपटू युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांच्यासह अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री मिमी चक्रवर्ती (माजी टीएमसी खासदार) आणि अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता) यांची चौकशी केली. तसेच काही ऑनलाईन प्रायोजकांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आल्यास त्यांच्या मालमत्तांवरही जप्तीची कारवाई होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने ऑनलाईन बेटिंग साइट ‘वनएक्सबेट’ विरुद्धच्या प्रकरणात धवनची 4.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि रैनाची 6.64 कोटी रुपयांची म्युच्युअल फंड जप्त करण्यासाठी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी केला आहे. ईडीच्या तपासात दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी जाणूनबुजून ‘वनएक्सबेट’ आणि त्याच्या सरोगेट्सना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी संस्थांसोबत जाहिरात करार केल्याचे दिसून आले आहे. सद्यस्थितीत ‘वनएक्सबेट’सह ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मना भारतात बंदी आहे.
Comments are closed.