सुरुची अडारकर आणि पियुष रानडे झाले आई-बाबा; नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घरी लक्ष्मीचं आगमन
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. दोघेही आई-बाबा झाले असून, त्यांच्या घरी चिमुकल्या मुलीचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरुचीने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाल्याने या आनंदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, सोशल मीडियावर दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुरुची अडारकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मुलगी झाल्याची माहिती दिली. “खूप आनंदाने आणि अभिमानाने संपूर्ण जगाला हे कळवण्यास आनंद होत आहे की आम्हाला मुलगी झाली आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टच्या शेवटी सुरुची आणि पियुष अशी दोघांची नावेही नमूद करण्यात आली आहेत.
इन्स्टाग्रामवर ही पोस्ट पहा
सुरुची आणि पियुषच्या या पोस्टनंतर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नम्रता संभेराव, श्रेया बुगडे, ऐश्वर्या नारकर, अद्वैत दादरकर, शर्वरी कुलकर्णी, कश्मिरा कुलकर्णी, नंदिता पाटकर, अक्षया गुरव, पल्लवी वैद्य, मेघना एरंडे, अभिजीत खांडकेकर, गिरिजा प्रभू यांच्यासह अनेक कलाकारांनी कमेंट्स करत या कलाकारांचे अभिनंदन केले. अधोक्षज कऱ्हाडेनेही त्यांच्या आनंदात सहभागी होत, “खूप अभिनंदन. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली. आई दुर्गेचा आशीर्वाद,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, चाहत्यांनीही सुरुची आणि पियुषवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “नवरात्रीला घरी लक्ष्मी आली”, “मुलीच्या जन्माची बातमी देण्यासाठी किती शुभ दिवस निवडला आहे”, “ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. तुमच्या दोघांचेही खूप अभिनंदन”, “गौरी घरी आली”, अशा भावनिक प्रतिक्रिया चाहत्यांकडून पाहायला मिळत आहेत.
Comments are closed.