चौदा वेळा साप चावल्यानंतरही वाचलो.

सापाची भीती माणसाला वाटणे स्वाभाविकच आहे. साप विषारी असो की नसो, माणूस नेहमी त्याच्यापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. विषारी नसलेला साप चावल्यास जीवाला धोका नसतो. पण विषारी साप कोणता आणि विषारी नसलेला कोणता हे ओळखणे सर्वसामान्यांसाठी शक्य नसते. त्यामुळे कोणत्याही सापाला माणूस घाबरतोच. उत्तर प्रदेश राज्याच्या झांशी येथे एक व्यक्ती अशी आहे, की तिला गेल्या 42 वर्षांमध्ये 14 वेळा साप चावला आहे. पण प्रत्येकवेळी या व्यक्तीचा जीव वाचला आहे. एका व्यक्तीला 14 वेळा साप चावणे, ही बाब दुर्मिळच मानली पाहिजे. आणि इतक्या वेळा सापाने दंश करुनही ती व्यक्ती जिवंत राहणे, हे त्याहीपेक्षा दुर्मिळ आहे. या व्यक्तीचे नाव सीताराम अहिरवार असे आहे. त्यांना 14 वेळा साप चावला, ही बाब जितकी आश्चर्यकारक आहे, त्याहीपेक्षा या सर्पदंशासंबंधी ते जी माहिती देतात ती अधिकच स्वारस्यपूर्ण आहे.

सीताराम अहिरवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जेव्हा साप चावणार असतो, त्याच्या आधी दोन दिवस त्यांना हा संकेत स्वप्नात मिळतो. त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला स्वप्नात सर्पाचे दर्शन होते. तसे दर्शन झाले की ते आपल्याला लवकरच सर्पदंश होणार आहे, याची जाणीव त्यांना होते. मग ते दोघही सावध होतात. प्रत्येक वेळी त्यांना साप चावतो, तेव्हा त्यांच्यावर स्थानिक झाडापाल्याचेच उपचार केले जातात. या उपचारांमुळे त्यांना बरे वाटते. मग मोठ्या रुग्णालयांमध्ये जाण्याची आवश्यकता उरत नाही. प्रत्येकवेळी हे असेच झाले आहे, असे ते स्पष्ट करतात.

त्यांच्या या विधानांवर अनेकांचा विश्वास बसत नाही. विषारी साप चावल्यास रुग्णालयांमध्ये आधुनिक उपचार, तेही लवकरात लवकर घेतल्यासच माणूस वाचू शकतो. तो झाडापाल्याच्या उपचाराने वाचू शकत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सीताराम अहिरवार यांना झालेले सर्पदंश विषारी नसलेल्या सापांचे असावेत. त्यामुळे ते अयोग्य उपचारांच्या नंतरही जिवंत राहू शकले, असे अनेक डॉक्टरांचे अनुमान आहे. तथापि, त्यांना चावलेले अनेक साप विषारी होते, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना ‘नाग का शिकार’ असे नवे संबोधन दिले आहे. एकंदर, हा प्रकार कोड्यात टाकणार आहे, हे निश्चित आहे.

Comments are closed.