आधी कर्णधारपद गेलं, मग टीम इंडियातूनही डच्चू; ‘असं कसं घडलं? सूर्यकुमार दीड महिन्यापासून करतोय विचार

विश्वचषक जिंकून देणाऱया कर्णधारालाच संघाबाहेरचा रस्ता दाखवला गेल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादवने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. कर्णधारपद गेल्यानंतर तब्बल दीड महिना आपण घरात बसून ‘असं कसं होऊ शकतं?’ याचा विचार करत होतो, असा गौप्यस्फोट सूर्यकुमारने केला आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूटय़ूब चॅनेलवरील मुलाखतीत सूर्यकुमारने पहिल्यांदाच कर्णधारपद गमावण्याबाबत सविस्तर भाष्य केले. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या टी-20 विश्वचषकापर्यंत आपण टीम इंडियाचे नेतृत्व करू, अशी अपेक्षा असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

'आता पुढे जाण्याची वेळ'; निवडकर्त्यांचा पह्न

हिंदुस्थानी संघाची घोषणा होण्याच्या तीन दिवस आधी निवड समितीने आपल्याशी फोनवरून संपर्क साधला होता, अशी माहिती सूर्यकुमारने दिली. ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तुझी संघात निवड होणार नाही. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे,’ असे निवडकर्त्यांनी सांगितल्याचे सूर्या म्हणाला. ‘त्यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यात माझी चूक नव्हती. तुम्ही घेतलेला निर्णय निश्चितच संघाच्या हिताचा असेल. असे आपण निवडकर्त्यांना सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले.

चहा-20 मधील नेतृत्वाला अचानक ब्रेक

सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 52 टी-20 सामने खेळले. त्यापैकी 42 सामने जिंकले, 8 गमावले, तर 2 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्याचा विजयाचा टक्का तब्बल 80.76 टक्के आहे. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने 2026 टी-20 विश्वचषक आणि 2025 आशिया चषक जिंकला.

विश्वचषक जिंकला आणि कर्णधारपद गेले!

यंदा 8 मार्चला सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरले. सलग दोन टी-20 विश्वचषक जिंकणारा हिंदुस्थानी संघ हा जगातील पहिलाच देश ठरला. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतरच निवड समितीने सूर्यकुमारकडून कर्णधारपद काढून घेत श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. इतकेच नव्हे तर, त्याला संघाबाहेर केले. खराब फॉर्म हे त्यामागचे कारण असल्याचे निवडकर्त्यांकडून सांगण्यात आले.

'स्वतःला निवडकर्त्यांच्या जागी ठेवले'

संघातून वगळल्यानंतर आपण निवडकर्त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार केला, असे सूर्यकुमारने सांगितले. भविष्यासाठी नवी टीम उभारण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी का घेतला असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. ‘संघात माझे नाव नव्हते तेव्हा मी हसलो. सामन्यादरम्यान दबावाची परिस्थिती आली की स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. असे होईल असे मला कधीच वाटले नव्हते,’ असे सूर्यकुमार म्हणाला. मात्र मिळालेल्या संधींसाठी त्याने आभारही मानले.

Comments are closed.