रोहितनंतर सूर्यकुमार यादवही कर्णधारपद गमावणार का? निवडकर्त्याचा खळबळजनक खुलासा
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एकदिवसीय आणि टी-20 दोन्ही सामन्यांसाठी संघ जाहीर केले आहेत. शुबमन गिलला भारताच्या एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. BCCI च्या या निर्णयानंतर, टी20 कर्णधार बदलण्याबाबतच्या चर्चांनाही वेग आला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा झाल्यानंतर BCCI चे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. भारताच्या एकदिवसीय कर्णधारपदातील बदलाबाबत अजित आगरकर म्हणाले, “तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असणे कठीण आहे.” आगरकर पुढे म्हणाले की “तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असल्याने रणनीतीमध्ये अडचणी निर्माण होतात.”
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला या फॉरमॅटचे कर्णधारपद देण्यात आले. गिलकडे आता भारताच्या एकदिवसीय संघाचेही नेतृत्व सोपवण्यात आले आहे. अजित आगरकरच्या विधानामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी एकाच कर्णधाराची नियुक्ती केली जाऊ शकते अशी अटकळ बांधली जात आहे. गिल कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार म्हणून काम करत असल्याने, भविष्यात गिलला टी-20 कर्णधार म्हणूनही नियुक्त केले जाऊ शकते अशी शक्यता आहे.
बीसीसीआयने अद्याप या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 चा टी-२० आशिया कप देखील जिंकला होता. त्यामुळे, भारतीय संघाच्या टी-20 कर्णधारात बदल होण्याची शक्यता नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादवला टी-20 संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे.
Comments are closed.