धोनीसोबत खास चर्चा अन् वर्ल्डकप विजय! सूर्यकुमारची ‘एलिट क्लब’मध्ये दमदार एंट्री

भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला, ज्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. हा क्षण खूप अभिमानाचा असल्याचे सांगितले. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत करून विजेतेपद पटकावले. या विजयासह भारत तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ बनला. आपले विजेतेपद यशस्वीरित्या राखणारा संघही बनला.

मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “२०२४ मध्ये आणि आता २०२६ मध्ये ट्रॉफी जिंकणे हा एक अतिशय खास अनुभव आहे. जेव्हा आम्ही २०२४ मध्ये विजेते झालो तेव्हा २०२६ मध्ये घरच्या भूमीवर ही कामगिरी पुन्हा करण्याचे स्वप्न पाहिले होते.” त्याच्या मते, संपूर्ण संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि हा ऐतिहासिक विजय मिळवला.

सूर्यकुमारने पुढील लक्ष्याबद्दल स्पष्ट संकेतही दिले. तो म्हणाला की, आता भारतीय संघाचे पुढील ध्येय २०२८ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे असेल. १२८ वर्षांनंतर २०२८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाईल. त्यामुळे, भारतीय संघासाठी ही एक मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. २०२८ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पुन्हा एकदा विजेतेपद जिंकणे हे संघाचे ध्येय असेल असेही त्यांनी नमूद केले.

भारतासाठी आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत आपले नाव आल्याबद्दल सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला. कपिल देव, एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या महान खेळाडूंसह नाव येणे हा खूप अभिमानाचा क्षण आहे असे तो म्हणाला. भविष्यातही भारतासाठी अधिक ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल असे तो म्हणाला.

सूर्यकुमारने आणखी एक खास खुलासा केला. टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी तो महेंद्रसिंग धोनीला भेटला होता. त्यावेळी धोनीने आयसीसी स्पर्धेत कसे खेळायचे याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या होत्या. धोनीने संघाला संघावर विश्वास ठेवण्याचा आणि धैर्याने खेळण्याचा सल्ला दिला होता, असं सूर्यकुमार म्हणाला.

विश्वचषक जिंकल्यानंतर संघाच्या सेलिब्रेशनबद्दल सूर्यकुमारने असेही सांगितले की, त्या रात्री संघाने खूप सेलिब्रेशन केले. “जर मी तो क्षण प्रत्येक चाहत्यासोबत शेअर करू शकलो असतो तर आणखी बरे झाले असते,” तो म्हणाला. आता, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर, तो आयपीएलची तयारी करेल.

Comments are closed.