पाकिस्तानवर विजय मिळवल्यावर सूर्यकुमार यादवची मोठी प्रतिक्रिया; चाहत्यांमध्ये जल्लोष!

टी20 विश्वचषकात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात करत हेड-टू-हेडमधील आपली आघाडी 8-1 अशी भक्कम केली. या दमदार विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होता. सामन्याच्या आदल्या दिवशीच त्याने संघाच्या तयारीवर विश्वास व्यक्त केला होता आणि संघाने मैदानात त्याची प्रचिती दिली.
टॉसवेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सूर्यकुमार यादवला या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणेच योग्य वाटत होते. “आम्हाला आधी फलंदाजी करायची होती आणि टॉस हरल्यानंतरही तीच संधी मिळाली,” असे त्याने सांगितले.
भारताची सुरुवात मात्र धक्कादायक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्या क्षणी संघावर दबाव आला; पण ईशान किशन याने परिस्थिती हातात घेतली. त्याने अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची स्फोटक खेळी साकारत सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. त्याच्या डावात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. पॉवरप्लेमध्ये त्याने दाखवलेली आक्रमकता निर्णायक ठरली.
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “एक विकेट लवकर गेल्यानंतर ईशानने वेगळा विचार केला आणि जबाबदारी स्वीकारली. पॉवरप्लेमध्ये आम्ही मोठी आघाडी घेतली.” त्याने खेळपट्टीबाबतही भाष्य केले. 7 ते 15 षटकांच्या दरम्यान पिच थोडी कठीण झाली होती, मात्र 175 धावा हा या विकेटवर उत्कृष्ट आणि स्पर्धात्मक स्कोर असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतीय गोलंदाजांनीही शिस्तबद्ध मारा करत पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही. या विजयासह भारताने टी20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली पकड आणखी मजबूत केली आहे.
Comments are closed.