वैभव सूर्यवंशीच्या टीम इंडियातील निवडीवर सूर्यकुमार यादवची खास पोस्ट! म्हणाला, तू हे कमावलं..
आयपीएल 2026 च्या हंगामात 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती. या शानदार कामगिरीनंतर त्याचे टीम इंडियातील स्थान निश्चित मानले जात होते. अखेर 6 जून रोजी बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह ‘एशियन गेम्स 2026’ साठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये वैभव सूर्यवंशीचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या निवडीनंतर आता सर्वांचे लक्ष त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाकडे लागले असून, त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून वैभवचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील प्रवासाबाबत आपला उत्साह व्यक्त केला आहे.
सध्या वैभव सूर्यवंशी भारतीय ‘अ’ (India-A) संघासोबत श्रीलंकेत आहे, जिथे 9 जूनपासून तिरंगी वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav on Vaibhav Suryavanshi) इंस्टाग्राम स्टोरीद्वारे वैभवचे अभिनंदन करताना लिहिले की, “तू हे यश तुझ्या मेहनतीने कमावले आहेस, खूप छान! तुझ्या पुढील प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे. उल्लेखनीय म्हणजे, आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने एकूण 776 धावा केल्या आणि 72 षटकार ठोकले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने ‘ऑरेंज कॅप’सह एकूण 5 पुरस्कार पटकावले होते.
भारतीय संघात निवड झाल्यामुळे वैभव सूर्यवंशीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Vaibhav Suryavanshi breaks Sachin Tendulkar’s record) एक मोठा विक्रम मागे टाकला आहे. भारतीय संघाच्या स्क्वाडमध्ये स्थान मिळवणारा तो आता सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. 1989 मध्ये जेव्हा सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले होते, तेव्हा त्यांचे वय 16 वर्षे होते. आता वैभवकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनण्याची संधी आहे, ज्यामुळे तो सचिन तेंडुलकरचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडू शकतो. सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 वर्षे 207 दिवसांत आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Comments are closed.