सूर्यकुमार यादवने 'या' दिग्गज खेळाडूकडे मागितली मदत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

टी20 संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करत आहे. टीम इंडियाने अलीकडेच टी20 आशिया कप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. मात्र संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही सूर्यकुमार यादव मोठ्या अडचणीत सापडला आहे. सूर्यकुमार आपल्या वनडे करिअरबद्दल चिंतेत आहे. यासाठी सूर्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सकडे मदतीची विनंती केली आहे, की त्यांनी त्याच्या वनडे करिअरला वाचवण्यासाठी काही मदत करावी.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने विमल कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जर मी एबी डिव्हिलियर्सला लवकर भेटलो, तर मी त्यांना नक्की विचारणार आहे की त्यांनी टी20 आणि वनडे करिअर कसं सांभाळलं, कारण मी तसं करू शकत नाही. मला असं वाटतं की वनडे क्रिकेटही टी20 प्रमाणेच खेळता येऊ शकतं.” त्याने पुढे म्हटले, “मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांनी या दोन्ही फॉरमॅट्समध्ये आपले करिअर इतके यशस्वी कसे केले.”

सूर्यकुमार पुढे म्हणाला, “एबी, जर माझे बोलणे तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तर कृपया लवकरात लवकर मी तुमच्याशी संपर्क साधू इच्छितो, कारण पुढचे 3-4 वर्षे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. मी वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा लवकर परतण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कृपया माझी मदत करा, कारण सध्या मी टी20 आणि वनडे या दोन्ही फॉरमॅट्सचा समतोल राखू शकत नाही.”

सूर्यकुमार यादवने आपल्या आतापर्यंतच्या वनडे करिअरमध्ये फक्त 37 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहेत. सूर्याने वनडेमध्ये 4 अर्धशतक झळकावली आहेत. तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 93 सामन्यांत 36.94 च्या सरासरीने 2,734 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे.

एबी डिव्हिलियर्सचे नाव केवळ दक्षिण आफ्रिकेपुरते मर्यादित नाही, तर जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये घेतले जाते. डिव्हिलियर्सने 228 सामन्यांच्या 218 डावांत एकूण 9,577 धावा केल्या आहेत. त्यांची वनडेतील फलंदाजी सरासरी 53.50 इतकी आहे. इतक्या मोठ्या करिअरमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी राखणे ही कोणत्याही खेळाडूसाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते.

Comments are closed.