VIDEO: सूर्या बनणार शाहरूख खानचा शेजारी! दुबईमध्ये विकत घेतले आलिशान घर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये एक नवीन घर खरेदी केले आहे. त्याने शाहरुख खानच्या इमारतीजवळच एका आलिशान मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. याबाबत त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओही शेअर केला.

सूर्यकुमार आयपीएल २०२६ पासून व्यावसायिक क्रिकेट खेळलेला नाही. अलिकडेच तो मुंबईतील एका स्थानिक टी२० स्पर्धेत खेळताना दिसला होता. याचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तो सध्या भारतीय संघाचा भाग नाही, मात्र त्याने अनेक मुलाखती दिल्या. त्यामधील विधानांनी तो कायम चर्चत असतो.

सूर्याने आता त्याचे लक्ष व्यावसायिक गुंतवणुकीकडे वळवले आहे. त्याने दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. त्याने याबाबत एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तो कागदपत्रांवर सह्या करताना दिसत आहे. यामध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी देविशा शेट्टीही आहे.

सूर्याने हे घर ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ कंपनीकडून खरेदी केले आहे. त्याने हे घर दुबईच्या मॅरिटाइम सिटी परिसरात खरेदी केले आहे. समुद्रकिनारी असलेला हा परिसर त्याच्या आलिशान वातावरणासाठी ओळखला जातो. त्याने हे घर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या इमारतीजवळ खरेदी केले आहे. ‘डॅन्यूब ग्रुप’ याच परिसरात ‘शाहरुख्स रेसिडेन्स’ नावाची इमारत बांधत असल्याचे समजते. तसेच सूर्यकुमारने दुबईमध्ये घर का खरेदी केले यामागचे कारण सांगितले आहे.

“आम्ही इथे आयपीएल खेळलो आहोत. मी २०१४ मध्ये दुबईला आलो होते. त्यानंतर पुन्हा २०२० मध्ये आलो. येथिल राहणीमान वेगळे आहे. मी मुंबईत जिथे राहतो, तेथे सुरक्षितता आहेच, मात्र सुरक्षिततेच्या बाबतीत दुबई सुद्धा चांगले आहे. इथे आल्याचा मला खूप आनंद होतो आणि दिलासाही मिळतो,” असे सूर्यकुमारने म्हटले आहे.

सूर्यकुमारने या घराची किंमत किंवा त्यात गुंतवलेली रक्कम उघड केलेली नाही.

Comments are closed.