Asia Cup: सूर्यकुमार यादव विरुद्ध सलमान आगा कुणाचं पारडं जड? जाणून घ्या दोन्ही कर्णधारांचे रेकॉर्डस

भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakunar Yadav) नेतृत्वाखाली यूएईवर 5 षटकांच्या आत विजय मिळवून आशिया कप 2025 स्पर्धेची दमदार सुरुवात केली. टीम इंडिया आता रविवारी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे (IND vs PAK). 14 सप्टेंबरला दुबईत जेव्हा दोन्ही देश भिडतील तेव्हा रोमांच शिगेला पोहोचेल. पाकिस्तानला असोसिएट टीम ओमानला ऑल-आउट करण्यासाठी तब्बल 17 षटके लागली. त्यामुळे पाकिस्तानी संघ या स्पर्धेसाठी किती तयार आहे हे स्पष्ट दिसून येते. पाकिस्तान मैदानावर उतरेल तेव्हा त्यांना भारतीय खेळाडूंबरोबरच भारतीय कर्णधारापासूनही सावध राहावे लागेल.

टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर रोहित शर्माने (Rohit Sharma)!टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ही जबाबदारी सूर्यकुमार यादववर (Suryakumar yadav) सोपवण्यात आली. दुसरीकडे, बाबर, शाहीन आणि रिजवान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचं खराब प्रदर्शन सुरू राहिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलमान आगाला (Salman Aaga) टी20 संघाची कमान दिली. त्यामुळे 14 सप्टेंबरच्या सामन्यात दोन्ही देशांच्या संघाबरोबरच दोन्ही कर्णधारांचीही खरी कसोटी लागणार आहे.

कर्णधार म्हणून रेकॉर्डकडे पाहिल्यास, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध चांगले प्रदर्शन केले आहे. तर सलमान आगा प्रामुख्याने उपखंडातच संघाचे नेतृत्व करत आला आहे. अलीकडेच पाकिस्तानने न्यूझीलंड दौरा केला, पण चार सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकण्यात त्यांना यश आलं.

सूर्यकुमार यादव आतापर्यंत भारताचा टी20 आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून उत्कृष्ट ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 23 पैकी 19 सामने जिंकले आहेत आणि अद्याप एकही मालिका गमावलेली नाही. सलमान आगाच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने चांगली क्रिकेट खेळली असली तरी बांगलादेशविरुद्धची एक होम सीरीज त्यांनी गमावली. कर्णधार म्हणून सलमानने आतापर्यंत 24 सामन्यांत 14 विजय मिळवले आहेत, तर 10 सामने गमावले आहेत. सूर्याचा टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये विजय टक्का 71.42 आहे.

फलंदाजी रेकॉर्डकडे पाहिल्यास, सूर्याने कर्णधार म्हणून 23 सामन्यांत 26.90 च्या सरासरीने आणि 164.24 च्या स्ट्राइक रेटने 565 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तर सलमान आगाने कर्णधार म्हणून 24 सामन्यांत 28.52 च्या सरासरीने आणि 116.02 च्या स्ट्राइक रेटने 485 धावा केल्या आहेत. सलमान शतक ठोकू शकलेला नाही, पण त्याने चार अर्धशतकं केली आहेत.

Comments are closed.