सूर्यकुमार यादवची मोठी झेप; तिसऱ्याच सामन्यात हार्दिक पांड्यालाही न जमलेला पराक्रम करत खास क्लबमध्ये एन्ट्री!

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामातील ८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ आपला नियमित कर्णधार हार्दिक पांड्याशिवाय मैदानात उतरला असून, त्याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव सांभाळत आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १६२ धावा केल्या. यामध्ये सूर्याच्या बॅटमधून ५१ धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली, ज्याच्या जोरावर त्याने एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले, जिथे हार्दिक पांड्याला अद्याप पोहोचता आलेले नाही.

​आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा अनेक खेळाडूंनी सांभाळली आहे, ज्यात सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्याने फक्त २ सामन्यांत मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते, मात्र त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नव्हती. आता या सामन्यात सूर्यकुमार यादवने अर्धशतक पूर्ण करताच, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी करणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. सूर्यापूर्वी ही कामगिरी रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि कायरन पोलार्ड यांनी केली होती.

​मुंबई इंडियन्ससाठी सलग तिसऱ्या आयपीएल हंगामात कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मात्र आतापर्यंत हा पराक्रम करू शकलेला नाही. हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये ३० सामन्यांत नेतृत्व केले आहे, ज्यात त्याला २६ डावांत फलंदाजीची संधी मिळाली. या २६ डावांत त्याने २१.८ च्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत, परंतु यामध्ये एकाही अर्धशतकाचा समावेश नाही.

Comments are closed.