IPL 2026 – सूर्यवंशीचा वार अन् बुमराची धार, मुंबई-राजस्थान यांच्यात आज तुल्यबळ सामना
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणारा सामना केवळ गुणांसाठी नाही, तर प्रतिष्ठेच्या लढाईसाठीही खेळला जाणार आहे. सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी आणि वेगाचा बादशहा जसप्रीत बुमरा यांच्यातील संघर्षाकडे. एकीकडे 15 वर्षांचा आरपार वार करणारा तर दुसरीकडे गोलंदाजीचा धारदार अनुभवी. त्यामुळे हे द्वंद्वच सामन्याचे खरे आकर्षण ठरणार आहे.
मुंबईकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंडय़ासारखी स्फोटक फलंदाजी आहे. त्यांना साथ देण्यासाठी बुमरा आणि ट्रेंट बोल्टची वेगवान जोडी सज्ज आहे. राजस्थानकडून यशस्वी जैसवाल आणि वैभव सूर्यवंशी आक्रमणाचा सूर लावतील, तर रियान पराग आणि हेटमायर शेवटचा तडाखा देण्यासाठी तयार आहेत. जोफ्रा आर्चर आणि रवी बिश्नोईची गोलंदाजी मुंबईला आव्हान देणार हे निश्चित आहे.
मुंबईत बदलांचे वारे
मुंबईला मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्लीविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंडय़ा आजारी असल्याने खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते. आता हार्दिकच्या पुनरागमनामुळे संघरचनेत बदल होण्याची शक्यता आहे. जर मुंबईने प्रथम फलंदाजी केली तर सूर्यकुमार यादवला प्लेइंग-11 बाहेर ठेवून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरले जाऊ शकते. याचबरोबर प्रथम गोलंदाजी करताना फलंदाजी मजबूत करण्यासाठी जसप्रीत बुमरा किंवा ट्रेंट बोल्ट यांपैकी एखाद्याला विश्रांती देत नंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरवले जाऊ शकते.
राजस्थानचा आत्मविश्वास शिगेला
सध्या राजस्थानचा आत्मविश्वास गगनाला भिडलाय. सूर्यवंशीची धडाकेबाज कामगिरी संघासाठी गेमचेंजर ठरत आहे. बिश्नोई आणि फरेरा यांच्यातील इम्पॅक्ट प्लेयरची अदलाबदलही महत्त्वाची ठरू शकते.
Comments are closed.