Sushma Andhare and Anjali Damania clash on social media over claims of joining Ajit Pawar’s faction


मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे विरोधक महायुती सरकारमधील घटक पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा एका ग्रुपवर केला. त्यांच्या या दाव्यानंतर आता सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. (Sushma Andhare and Anjali Damania clash on social media over claims of joining Ajit Pawar’s faction)

नावाची पाटी काढून टाकण्यात आली आहे. सुषमा अंधारे अजित पवार गटात प्रवेश करणार? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी एका ग्रुपवर उपस्थित केला होता. या संदर्भातील फोटो ट्वीट करताना सुषमा अंधारे भडकून म्हणाल्या होत्या की, अहो दमानिया, जरा दमानं घ्या की…, किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस… कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला… ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या पीआर म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावर अंजली दमानिया यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – Prithviraj Chavan : भाजपाने भूमिका बदलल्यामुळेच…; जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले चव्हाण?

अंजली दमानिया यांनी ट्वीट करताना म्हटले की, केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान… असो… पण मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे. खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की, तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे क नाही, यावर तुम्ही खरं उत्तर द्याल का? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला.

अंजली दमानिया म्हणाल्या की, जर मला बातमी करायची असती तर मी तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा. आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही. प्रकाशझोतात ज्यांना यायचं असत ते वाट्टेल ते करतात… त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला या जन्मी जमणार नाही, असा टोला लगावतानाच अंजली दमानिया म्हणाल्या की, तुमच्या माहितीसाठी, काल एका चैनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक मीडिया ब्रॉडकास्टच्या व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल

अंजली दमानिया यांच्या स्पष्टीकरणानंतर सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे. ठाकरे-पवार यांना लक्ष्य करताना नागपूर आणि परिसरातील फडणवीस, बावनकुळे व मुनगुंटीवार यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल? असो, ज्यांच्या पे रोलवर तुम्ही काम करता त्यांच्याकडून नीट माहिती घ्या. परंतु चुकीच्या बिळात हात घातला तर दंश महागात पडेल, असा इशारा सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांना दिला.

हेही वाचा – Pune : ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचा सरकारचा दावा; पुरावा देत रोहित पवारांची फडणवीस-अजितदादांना विनंती





Source link

Comments are closed.