Sushma Andhare has asked where Neelam Gorhe got two Mercedes for her first MLA term


शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंनी पहिल्या आमदारकींसाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? असा प्रश्न विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हेंच्या देश आणि विदेशातील खात्यांची तपासणी करावी लागेल. याशिवाय नीलम गोऱ्हेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा खळबळजनक आरोप विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंनी पहिल्या आमदारकींसाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? असा प्रश्न विचारला आहे. तसेच नीलम गोऱ्हेंच्या देश आणि विदेशातील खात्यांची तपासणी करावी लागेल. याशिवाय नीलम गोऱ्हेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही, असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे. (Sushma Andhare has asked where Neelam Gorhe got two Mercedes for her first MLA term)

माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कामाची सुरुवात करताना भारतीय विद्यार्थी महासंघामधून केली. त्यानंतर त्यांनी भारिप बहुजन संघात उडी मारली. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे त्यांना ओळख मिळाली. परंतु ईमानदारी आणि प्रामाणिकपणा त्यांच्या शब्दकोशात नाही. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी बेइमानी केली आणि शरद पवारांकडे गेल्या. त्यानंतर त्यांनी तिथेही पक्षाशी बेईमानी करून त्या आमच्याकडे आल्या. नीलम गोऱ्हेंना आमच्या पक्षाने चार वेळा आमदारकी दिली. परंतु त्यांनी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील भागात शिवसेनेची एक साधी शाखाही उघडली नाही.

हेही वाचा – Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून…; ठाकरे गटाकडून खळबळजनक आरोप

आमच्या पक्षातल्या कित्येक निष्ठावंत लोकांची संधी त्यांनी हिरावून घेतली. मातोश्रीवर सातत्याने पडिक राहून निष्ठावंत लोकांची मतं कलुषित करणे एवढेच प्रमुख काम त्यांनी चोखपणे बजावले. ज्या नीलम गोऱ्हेंना पक्षाने चार वेळेला आमदारकी दिली. त्या नीलम गोऱ्हेंनी शहरातला एक नगरसेवक सोडा, त्या राहत असलेल्या मॉडेल भागात शिवसेनेची शाखा देखील उभी केली. नीलम गोऱ्हेंनी पक्षाच्या संघटनेसाठी कोणतेही काम केले नाही. पक्ष संघटनेमध्ये लोकांचे प्रवेश कसे थांबवता येतील, तसेच लोकांना कसे बाजूला ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले. मी स्वत: नीलम गोऱ्हेंकडे 2017 ला शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात विनंती केली होती. पण नीलम गोऱ्हेंनी 2017 ते 2022 पर्यंत माझा पक्षप्रवेश होऊ दिला नाही. त्यानंतर नीलम गोऱ्हेंना न सांगता गुपचूप सचिन अहीर यांच्या उपस्थितीत माझा शिवसेनेत प्रवेश झाला. माझा शिवसेनेत पक्षप्रवेश होईपर्यंत ही बातमी नीलम गोऱ्हे यांच्या कानावर पडू नये याची काळजी अनेक नेत्यांनी घेतली, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला.

गोऱ्हेंनी आमदारकीसाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, हडपसर भागात पीएमटीने डीपेन्ससीरीजची प्रक्टिस करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी पहिली आमदारकी घेण्यासाठी दोन मर्सिडीज कुठून आणल्या? असा सवाल सुषमा अंधारी यांनी विचारला. त्यांनी असेही म्हटले की, नीलम गोऱ्हेंचा असा कोणता व्यवसाय आहे की, ज्यामुळे त्यांनी अडीचशे कोटींची प्रापर्टी वाढली. नीलम गोऱ्हेंची भारतातील आणि विदेशातील खाती तपासावी लागतील. मला इतर लोकांना यात ओढायची इच्छा नाही. परंतु साहित्य संमेलनात साहित्यिक लोकांना बोलावलं जातं. त्या व्यक्तीचं एखादा कविता संग्रह, वैचारीक संग्रह, समिक्षा ग्रंथ, कादंबरी, कथा किंवा चारोळी संग्रह तरी प्रकाशित असावा. नीलम गोऱ्हेंना व्यासपीठावर कोणत्या निकषाने साहित्यमंडळाने आणलं होतं, हे स्पष्ट झालं पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – Sharad Pawar : साहित्य संमेलनातील कथित चिखलफेकीबाबत शरद पवार बोलणार का? पत्रकार परिषदेकडे लक्ष



Source link

Comments are closed.