Sushma Andhare reveals the political connections of the Hagawane family by sharing photos


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. या दोन्ही फोटोंमधून अंधारेंनी हगवणे कुटुंबाचे राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले राजकीय लागेबांधे अंधारेंनी उघड केले आहेत.

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. वैष्णवीने तिच्या सासरच्या मंडळींच्या छळामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहेत. या घटनेनंतर हगवणे कुटुंबाचे म्हणजेच वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे, नणंद करिष्मा हगवणे यांचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी लागेबंध असल्याची माहिती समोर आली. पण पक्षाने सुद्धा काही तासांमध्येच यांची पक्षातून हकालपट्टी केली. पण राजकीय वरदहस्तामुळेच राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेला वेळ लागल्याची चर्चा रंगली आहे. पण अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. (Sushma Andhare reveals the political connections of the Hagawane family by sharing photos)

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील पहिल्या फोटोमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पुष्पगुच्छ देताना दिसून येत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत वैष्णवीची नणंद करिष्मा हिने एका सोफ्यावर बसून एका कार्यक्रमात फोटो काढला आहे. हे दोन्ही फोटो पोस्ट करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय नेत्यांशी हगवणे कुटुंबाचे राजकीय स्नेह होते, याबाबतची माहिती उघड केली आहे. “गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कसे मिळते किंवा गुन्हेगार स्वतःची राजकीय प्रतिष्ठा कसे वाढवतात यासाठी हे दोन फोटो बोलके आहेत.” असेही अंधारे यांनी हे फोटो पोस्ट करत म्हटले आहे.

हेही वाचा… Vaishnavi Hagawane : अटकेआधी मटणावर ताव, तळेगावात मुक्काम अन् राजेंद्र-सुशील हगवणेचा अटकेचा थरार

काय आहे सुषमा अंधारेंची पोस्ट?

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हगवणे कुटुंबाशी संबंधित दोन फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, “गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कसे मिळते किंवा गुन्हेगार स्वतःची राजकीय प्रतिष्ठा कसे वाढवतात यासाठी हे दोन फोटो बोलके आहेत. हे फोटो गर्दीत कुणीतरी येऊन उभे राहून काढलेले फोटो नाहीत तर अगदी फोटोतील वावर बघितला तरी लक्षात येते की, राजकीय नेत्यांशी असणारे यांचे संबंध कौटुंबिक स्नेहाचे आहेत. यातल्या पहिल्या फोटोमध्ये चाकणकर यांच्या बाजूला उभा असणारा तरुण हा सुशील हगवणे आहे जो मयुरी हगवणेचा नवरा आहे. ज्या मयुरीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती.”

तर, “दुसऱ्या फोटोमध्ये राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे दिसत आहेत. फोटो अजिबात गर्दीतला नाही तर अतिशय निगुतीने सलगीने काढलेला फोटो आहे. फोटोमध्ये लाल ड्रेसवर दिसणारी तरुणी ही वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे आहे, जी करिष्मा वैष्णवीवर थुंकली. एका महिलेवर थुंकणारी दुसरी महिला महिला बालकल्याण मंत्र्याच्या बाजूला बसते…” असे अंधारेंनी लिहिलेली आहे. त्यामुळे आता या फोटोवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही महिला नेत्या नेमका काय खुलासा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Comments are closed.