Sushma Andhare strongly criticizes Naresh Mhaske
जो बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न नरेश म्हस्के यांच्याकडून होत आहे, तो चीड आणणारा आहे. अशा दु:खद प्रसंगातही आर्थिक परिस्थिवरून लोकांची हेटाळणी करता? त्यांची कुचेष्टा करता?
(SS UBT Vs SS) मुंबई : काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी (22 एप्रिल 2025) दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. तर, तेथील इतर पर्यटकांना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात सुखरुप आणले जात आहे. राज्याचे दोन प्रमुख मंत्री तिथे पोहोचले आहेत. त्यातच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. (Sushma Andhare strongly criticizes Naresh Mhaske)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा तसेच पनवेलच्या दिलीप देसले यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेले पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर उर्वरित पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. त्यानुसार ते श्रीनगरमध्ये दाखलही झाले. पण त्याचबरोबर शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही तिथे पोहोचले.
हेही वाचा – Pahalgam Terror Attack : सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरूच, सुषमा अंधारेंचा शिंदेंवर निशाणा
एकनाथ शिंदे हे जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्यानंतर विरोधकांनी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले की, एक जबाबदार व्यक्ती तिथे गेला तर विरोधक त्याला कुरघोडी आणि श्रेयवाद म्हणतात. उलट, 45 लोक रेल्वेने पहलगामला गेले होते आणि दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ते तिथे अडकले. या लोकांना एका सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहायला लागले. परंतु त्या लोकांना एकनाथ शिंदे यानी विमानतळावर आणले आणि ती लोक पहिल्यांदाच विमानात बसली.
त्यांच्या या वक्तव्यावरन वादंग निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून नरेश म्हस्के यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जो बडेजाव मिरवण्याचा प्रयत्न नरेश म्हस्के यांच्याकडून होत आहे, तो चीड आणणारा आहे. अशा दु:खद प्रसंगातही आर्थिक परिस्थिवरून लोकांची हेटाळणी करता? त्यांची कुचेष्टा करता? पहलगामच्या घटनेमुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. नरेश म्हस्के यांचे वक्तव्य म्हणजे, या जखमी मनांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका करतानाच, तुम्ही या सगळ्या गोष्टी नाही केल्यात तरी चालेल, पण जखमेवर मीठ चोळणे बंद करा, असे त्यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : …त्या सगळ्यांपासून देशाला खरा धोका, ठाकरेंकडून सावधगिरीचा इशारा
Comments are closed.