एमबीबीएस विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू
वादग्रस्त आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा चर्चेत
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील कमरहाटी येथील स्वत:च्या खोलीत संशयास्पद स्थितीत मृत आढळून आली आहे. या विद्यार्थिनीचे नाव आइवी प्रसाद असून ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिचा मृतदेह क्वार्टरमधील तिच्या खोलीत सापडला आहे.
आयवी प्रसादचे वडिल विद्यासागर प्रसाद बँकेत कार्यरत असून सध्या ते मुंबईत नियुक्त आहेत. तर तिची आई सुमित्रा प्रसाद या कमरहाटी येथील ईएसआय रुग्णालयात डॉक्टर आहेत. ती स्वत:च्या आईसोबतच क्वार्टरमध्ये राहत होती. तर घटना घडलेल्या रात्री ती स्वत:च्या खोलीत एकटीच होती. तर आई दुसऱ्या खोलीत होती.
मुलगी स्वत:च्या खोलीत अभ्यास करत असेल म्हणून सुमित्रा प्रसाद यांनी तिला हाक मारणे टाळले होते. परंतु बराचवेळ ती बाहेर न आल्याने त्यांना चिंता झाली. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता आइवीने गळफास घेतल्याचे दिसून आले. विद्यार्थिनी नैराश्यात होती असे सांगण्यात येत आहे.
आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी एका महिला डॉक्टरवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेवरून पश्चिम बंगालमध्ये तीव्र निदर्शने झाली होती. या घटनेतील आरोपीला न्यायालयाने अलिकडेच शिक्षा सुनावली आहे.
Comments are closed.