स्वदेशी बीएसएनएल 4 जी लॉन्च
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 97,500 टॉवर्सचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, भुवनेश्वर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशात बीएसएनएलचे पूर्णपणे स्वदेशी 4-जी नेटवर्क लाँच केले. त्यांनी ओडिशातील झारसुगुडा येथून देशभरातील 97,500 हून अधिक बीएसएनएल मोबाईल टॉवर्सचे उद्घाटन केले. हे नवीन टॉवर्स ओडिशा, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात आणि बिहारसह विविध राज्यांमधील 20 लाखांहून अधिक नवीन ग्राहकांना सेवा देतील. तसेच एकंदर डिजिटल इंडिया फंड उपक्रमांतर्गत अंदाजे 29,000 ते 30,000 गावांमध्ये कनेक्टिव्हिटी येईल.
नवीनतम 4-जी टॉवर्स पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून साकारण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 37,000 कोटी रुपये इतकी आहे. या सेवेमुळे भारत स्वदेशी दूरसंचार उपकरणे विकसित करणाऱ्या देशांच्या पंगतीत सामील झाला आहे. हा उपक्रम डिजिटल भारत निधी कार्यक्रमांतर्गत 100 टक्के 4-जी उद्दिष्ट साध्य करण्याचा एक भाग आहे.
बीएसएनएलचा पूर्णपणे स्वदेशी 4-जी स्टॅक भारताच्या तांत्रिक स्वावलंबनाचे प्रतीक ठरला आहे. देशातील दूरसंचार पायाभूत सुविधांचा सर्वात मोठा विकास या माध्यमातून साधण्यात आला आहे. स्वदेशी 4-जी नेटवर्क्सची रोलआउट ही पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया व्हिजनच्या अनुषंगाने एक परिवर्तनकारी पाऊल आहे, असे दूरसंचार विभागाने आपल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. या सुविधेमुळे डिजिटल यंत्रणेला गती मिळणार असून ग्रामीण समुदायांना सक्षम बनवते. हे बीएसएनएलच्या 5-जी अपग्रेड आणि एकत्रीकरणासाठी देखील मार्ग मोकळा करते. हे नेटवर्क क्लाउड-बेस्ड, भविष्यासाठी तयार आणि 5-जी नेटवर्कमध्ये अपग्रेड करण्यायोग्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दुर्गम भागांना लाभ होणार
पंतप्रधान मोदींनी देशभरातील 97,500 हून अधिक टॉवर्सचे उद्घाटन केले आहे. यापैकी 92,600 टॉवर्स बीएसएनएलने कार्यान्वित केले आहेत. डिजिटल इंडिया फंड कार्यक्रमांतर्गत आणखी 18,900 साइट्सना निधी देण्यात आला. नवीन टॉवर्सच्या अंमलबजावणीमुळे बीएसएनएल रेंज न पोहोचलेल्या 29,000 हून अधिक गावांना लाभ होणार आहे. यामध्ये दुर्गम आणि सीमावर्ती भागातील गावांचा समावेश आहे. एकट्या ओडिशामध्ये या लाँचिंगद्वारे अंदाजे 2,472 गावे जोडली जातील, असे जाहीर करण्यात आले आहे.
नवीन टॉवर्स सौरऊर्जेवर चालणारे असल्यामुळे हे देशातील ग्रीन टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चरचा सर्वात मोठा क्लस्टर बनला आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पूर्वी सांगितले होते की या आर्किटेक्चरमध्ये ‘सी-डॉट’द्वारे बांधलेले कोर नेटवर्क, तेजस नेटवर्क्स द्वारे रेडिओ अॅक्सेस नेटवर्क आणि टीसीएसद्वारे सिस्टम इंटिग्रेशन समाविष्ट आहे. यासह, भारत आता स्वदेशी दूरसंचार उपकरणे विकसित करणाऱ्या डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या देशांच्या रांगेत सामील झाला आहे.
Comments are closed.