स्वामीजी, आम्ही कृतघ्न आहोत; मुख्यमंत्र्यांना तुमच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी वेळ नाही! 8 वर्षांपासून मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा प्रणेता गुंडाळून ठेवला

निजामाच्या पोखडातून हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी ज्वलंत राष्ट्रविचारांचा वन्ही चेतवणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळच नाही! पण राजकीय कार्यकर्त्यांकडे न बोलावताच जाण्याचे औदार्य मुख्यमंत्र्यांकडे आहे. सहा महिन्यांपासून निमंत्रणाची सर्व औपचारिकता पूर्ण करूनही मुख्यमंत्री कार्यालयाने पुतळा अनावरणासाठी वेळ देण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. कृतघ्नपणा, कोडगेपणा, निर्धावलेपणाच्याही पलीकडचा हा माजोरडेपणा आहे.

दरवर्षी १७ सप्टेंबर आला की मुख्यमंत्री लवाजम्यासह वाजतगाजत छत्रपती संभाजीनगरात येतात. गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यसैनिकांची एकच मागणी होती, शहरात मुक्तिलढा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला, त्या स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारण्यात यावा. सुरुवातीची अनेक वर्षे स्वामीजींच्या पुतळ्यासाठी जागाच मिळाली नाही. छत्रपती संभाजीनगरातून स्वामीजी लोकसभेवर निवडून गेले होते. मुक्तिलढ्याच्या निमित्ताने त्यांचे या शहरात बराच काळ वास्तव्यही होते. स्वामीजी मूळचे कर्नाटकातले, परंतु त्यांनी मराठवाडयालाच आपली कर्मभूमी मानले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी काम केले.

मराठवाड्यातून मुख्यमंत्री झालेल्या शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, डॉ. शिवाजीराव निलंगेकर, अशोक चव्हाण या सर्वांनी स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा उभारणार असल्याच्या घोषणा केल्या… पण बरीच वर्षे काहीच झाले नाही.

अखेर जागा मिळाली छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक हा प्रत्येक क्षणाचा साक्षीदार. याच परिसरात असलेल्या झाशीच्या राणीच्या पुतळा परिसरात सर्वांत उंच ध्वज उभारण्यात आला. येथेच स्वामीजींचा पुतळा उभारण्याचे निश्चित करून चौथराही उभारण्यात आला. निरंजन मडिलगेकर यांनी बनवलेला पुतळा सर्वांच्या पसंतीस उतरला. झाकलेला पुतळा चौथऱ्यावर आणून ठेवण्यात आला. पुतळ्याचे अनावरण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

कला संचालनालयाच्या पत्राने अडचण

भ्रष्ट कारभारामुळे मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला. त्यानंतर कला संचालनालयाने राज्यात ज्या ठिकाणी पुतळे उभारण्यात आलेले आहेत, उभारण्यात येणार आहेत त्या सर्व जागांची पाहणी करून ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पुतळ्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे फर्मान काढले. कला संचालनालयाच्या पथकाने स्वामीजींच्या पुतळ्याची जागा पाहिली. चौथरा उंच करण्यासह काही सूचना केल्या. गुत्तेदाराकडून हे काम करून घेण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारीत पुतळा अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले. तेव्हापासून सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु प्रतिसादच मिळत नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्री कितीदा आले आणि गेले…

छत्रपती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजीनगरात कार्यक्रमाच्या निमित्ताने कितीदा आले आणि गेले. मुख्यमंत्र्यांना किरकोळ राजकीय कार्यकत्यांकडे जाण्यासाठी वेळ मिळाला, पण स्वामीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी दहा मिनिटेही त्यांच्याकडे नाहीत. आताही मुख्यमंत्री १७ सप्टेंबरला येतील, ध्वजारोहण करतील, मुक्तिसंग्रामाबद्दलही बोलतील… पण ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला त्यांच्या पुतळ्याबद्दल चकार शब्दही काढणार नाहीत.

Comments are closed.