वेधक – चिकणमातीच्या मूर्तींची अविरत परंपरा

>> स्वप्नील साळसकर

वालावलमधील लक्ष्मण गोवेकर यांच्या चित्रशाळेत त्यांची तिसरी पिढी गणेश मूर्तींची घडवणूक करत आहेत. गेल्या 60 वर्षांचा हा अविरत वारसा, ही कला परंपरा गोवेकरांनी जिवंत ठेवली आहे.

सिंधुदुर्गात कुडाळ तालुक्यातील वालावलमधील दत्तात्रय गोवेकर कुटुंबीयांच्या गणेश चित्रशाळेत मागील 60 वर्षांपासून चिकणमातीपासून (स्थानिक माती) मूर्ती घडवण्याची कला जोपासली जात आहे. तिसऱया पिढीत बाप्पा घडवले जात असतानाच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मागणीला सपशेल नकार दिला जात आहे. पर्यावरणपूरक उत्सव जपत गोवेकर आपली कला जिवंत ठेवताना दिसत आहेत.

वालावलमधील आपल्या वडिलोपार्जित गणेश चित्रशाळेत आजोबा लक्ष्मण गोवेकर, त्यानंतर वडील दत्तात्रय गोवेकर आणि आता मुले समीर आणि राजेश दरवर्षी चिकणमातीच्या जवळपास 60 मूर्तींची घडवणूक करत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आम्ही फक्त स्थानिक मातीचेच गणपती तयार करतो असे गोवेकर कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शाडू मातीप्रमाणेच विरघळणारी ही चिकणमाती पूर्वी कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावातून आणली जायची. मात्र आता त्या ठिकाणी उपलब्धता नसल्यामुळे सध्याच्या घडीला वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणीमधून डंपरच्या सहाय्याने ती खरेदी केली जाते. अलीकडे माती, रंग यासह साजशृंगाराचे साहित्य महागल्याने मूर्तींचे दरही वाढवावे लागल्याचे गोवेकर सांगतात. साधारण दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंतच गणेशमूर्ती घडवण्याचे काम या चित्रशाळेत चालते.

या चित्रशाळेत विविध रूपांतील हाती मूर्ती साकारण्याची कलाही तेवढय़ाच कल्पकतेने केली जात असून भगवान परशुराम अवतारातील गणपती, शेषनागासमवेत असलेले गणेश, दशावतारातील राजाच्या अवतारातील मूर्ती, कोळंबीवर  विराजमान झालेले गणराय यासह विविध आकर्षक मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात. मूर्तीच्या मजबुतीसाठी नैसर्गिक नारळाच्या टरफलापासून तयार होणाऱया काथ्याचा वापर करून मजबूत मूर्ती तयार केली जाते. त्यामुळे मातीही कमी लागत असून वजनालाही मूर्ती हलकी होते. अशी मूर्ती लवकर सुकत असल्यामुळे रंगरंगोटीसाठी लवकर सुरुवात होते. अलीकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे माती मळण्यासाठी आलेल्या मशीनचा वापर केला जात असून काम थोडे जलद झाले. शिवाय शारीरिक ऊर्जेची बचतही झाली असल्याचे गोवेकर सांगतात.

मूर्ती घडवत असताना कामकाजाचे टप्पेही तसेच प्रकारे तयार केले जातात. सुरुवातीला मूर्ती तयार करून घेतल्यानंतर कोरीवकाम, रंगकाम, साजशृंगार करत गणेशोत्सवाअगोदर तीन दिवस सर्व काम पूर्ण केले जाते. वेंगुर्ला, तळवडे कांबळे विहीर, निवती, पाट, परुळे, चेंदवण, उर्वरित वालावल गावांमधील मागणी असलेले ग्रामस्थ आदल्या दिवशीपर्यंतच मूर्ती आपल्या घरी घेऊन जातात.

परंपरा कायम जपणार

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वजनाला हलक्या, वेगवेगळ्या डिझाइन्स यांचे आकर्षण वाढल्यामुळे 90 असलेली संख्या आता हळूहळू 60 गणेशमूर्तींपर्यंत येऊन पोहोचली. मात्र आम्ही चिकणमातीचा गणराया तयार करणार, जो वर्षभर पाण्यात न राहता विरघळला पाहिजे, असे समीर गोवेकर यांचे म्हणणे आहे. गणपतीची मूर्ती ही पारंपरिक असली पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो.

[email protected]

Comments are closed.