सीजेपीच्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिस ॲक्शन मोडमध्ये; उत्तर प्रदेशातून स्वतंत्र भारद्वाज ताब्यात – TMarathiNews
नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)च्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी कारवाईला वेग दिला असून, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्याच्या वडिलांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या स्वतंत्र भारद्वाज याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याला बुलंदशहरमधील चोला पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
स्वतंत्र भारद्वाज याच्या अटकेच्या मागणीसाठी सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यावेळी आंदोलकांनी दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भारद्वाज याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर 72 तासांच्या आत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता भारद्वाज याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मुलाखत व्हायरल झाल्यानंतर आंदोलनाला वेग
स्वतंत्र भारद्वाज याची एक मुलाखत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. या मुलाखतीत त्याने जुलै महिन्यात जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आंदोलक निशू आझाद यांचे वडील संजय कुमार यांना गंभीर दुखापत केल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे.
तसेच, आपल्या राजकीय प्रभावामुळे आपल्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही भारद्वाज याने मुलाखतीत म्हटल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सीजेपी समर्थक तसेच दलित कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
आंदोलकांनी पोलिसांवर केले आरोप
भारद्वाज याच्यावर अद्याप कठोर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप करत सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यावेळी दिल्ली पोलिसांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह आझाद समाज पक्षाचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद सहभागी झाले होते.
दरम्यान, भारद्वाज याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.