FIFA World Cup 2026 – स्वित्झर्लंडचा एकतर्फी विजय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्वित्झर्लंडने सुरुवातच आक्रमक करत अल्जेरियाला आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले.  स्ट्रायकर ब्रील एम्बोलोने सामन्याच्या सुरुवातीलाच गोल केला. त्यानंतर विंगर डॅन न्दोयेने दुसरा गोल करून संघाला अल्जेरियावर 2-0 असा सहज विजय मिळवून दिला. या विजयामुळे स्वित्झर्लंडने फिफा विश्वचषकाच्या अंतिम 16 संघांमध्ये प्रवेश केला, जिथे पुढील आठवडय़ात व्हँकुव्हरमध्ये त्यांचा सामना कोलंबिया किंवा घानाशी होईल.

मुरत याकिनच्या स्विस संघाने डावपेचांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांनी आपली रचना बदलून आणि अल्जेरियासाठी सापळे रचले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी दोन अनपेक्षित गोल करून त्यांना धक्का दिला. स्विस संघाने आपल्याच अर्ध्या मैदानात चेंडूवर ताबा मिळवला आणि 20 वर्षीय योहान मानझाम्बीला डाव्या बाजूने प्रतिहल्ल्यावर पाठवले. त्याने एम्बोलोकडे चेंडू पास केला, ज्याने दहाव्या मिनिटाला अगदी जवळून चेंडू जाळ्यात ढकलला. आघाडी मिळाल्यानंतर स्वित्झर्लंडने चेंडू ताब्यात नसताना पाच मिडफिल्डर्सचा वापर केला.

मध्यंतरानंतर स्विस संघाने पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केले. उजव्या बाजूने चालवलेल्या या आक्रमणादरम्यान रफिक बेलघालीने चेंडू अपुऱया ताकदीने क्लिअर केला. ज्यामुळे तो एनडोयेच्या पायाशी आला आणि या विंगरने गोलरक्षक लुका झिदानच्या झेप घेण्याच्या प्रयत्नांना चकवून चेंडू जाळीत धाडला. या गोलमुळे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Comments are closed.