सामना संपताच तब्येत बिघडली, टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल रुग्णालयात दाखल

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. त्यामुळे सामने सुद्धा चुरशीचे होताना पाहायला मिळत आहेत. मंगळवारी (16 डिसेंबर 2025) मुंबई आणि राजस्थान यांच्यामध्ये पुण्यात सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईने बाजी मारली आणि सामना 3 विकेटने जिंकला. मात्र, सामना संपताच काही वेळाने यशस्वी जयस्वालची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई आणि राजस्थान यांच्यात सामना झाल्यानंतर काही तासांनी यशस्वीच्या पोटामध्ये दुखायला लागलं. त्यामुळे त्याला आदित्या बिर्ला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. Times of India तशी माहिती दिली आहे. तसेच त्याला सध्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल खास कामगिरी करू शकला नाही. तो 16 चेंडूंमध्ये 15 धावा करून बाद झाला होता.
राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 217 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र, अजिंक्य रहाणे आमि सरफराज खान यांनी खिंड लढवत संघाची गाडी रुळावर आणली. सरफराज खानने 22 चेंडूंमध्ये 73 धावांची वादळी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली. तर अजिंक्य रहाणेने नाबाद 72 धावा चोपून काढल्या आणि संघाचा विजय निश्चित केला.

Comments are closed.