सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत यशस्वी जयस्वालची धमाकेदार शतकी खेळी! गोलंदाजांसाठी ठरला डोकेदुखी
सध्या भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 (SMAT 2025-26) आयोजित केली आहे, ज्यात अनेक भारतीय स्टार खेळाडू भाग घेत आहेत. 14 डिसेंबर रोजी मुंबई आणि हरियाणा यांच्यात एक सामना खेळला गेला. या सामन्यात मुंबईकडून सलामी फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) धुमाकूळ घातला. त्याने जोरदार शतक ठोकून हरियाणाच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना 4 विकेट्सने जिंकला.
235 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला जबरदस्त सुरुवात मिळाली. अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. रहाणे 10 चेंडूत 21 धावा करून बाद झाला, पण जयस्वालने एका टोकाकडून किल्ला लढवत हरियाणाच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. त्याने 50 चेंडूंमध्ये 101 धावांची उत्कृष्ट खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले. या दरम्यान जयस्वालचा स्ट्राइक रेट 202 इतका होता.
जयस्वाल सध्या भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा भाग आहे, पण त्याला टी-20 संघात भारतासाठी संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत, शतक ठोकून त्याने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी जोरदार दावा केला आहे.
हरियाणा संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 234/3 धावा केल्या होत्या. हरियाणाकडून अंकित कुमारने 42 चेंडूत 89 धावा, तर निशांत सिंधूने 38 चेंडूत 63 धावांची खेळी केली. मुंबई संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 17.3 षटकांतच 6 गडी गमावून 238 धावा करून लक्ष्य गाठले. जयस्वालशिवाय सरफराज खानने 25 चेंडूंमध्ये 64 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मुंबईने हा सामना 4 विकेट्सने जिंकून स्पर्धेत आपला पुढचा प्रवास सुरू ठेवला.
Comments are closed.