हिंदुस्थानने दिल्ली जिंकली, पण…
मुंबई जिंकल्यानंतर हिंदुस्थानने दिल्लीही जिंकली, पण जे अमेरिकेविरुद्ध घडले होते त्याचीच पुनरावृत्ती नामिबिया या दुबळ्या संघाविरुद्धही झाली. मुंबईत आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले होते, तर दिल्लीत 250 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारण्याच्या उंबरठय़ावर असलेला हिंदुस्थानी संघ 4 बाद 205 वरून उडालेल्या घसरगुंडीमुळे शेवटच्या 11 चेंडूंत केवळ 4 धावाच काढू शकला आणि आपला अर्धा संघही गमावला. हिंदुस्थानने नामिबियाचा डाव 116 धावांत संपवला असला तरी फलंदाजांची उडालेली तारांबळ पाहून हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या काळजात धस्स झाले आहे.
आजच्या 93 धावांच्या विजयासह हिंदुस्थानने ‘अ’ गटात 4 गुणांसह अव्वल स्थान काबीज केले आहे. आता 15 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या पारंपरिक लढतीत विजयी ठरणारा संघ सुपर एटचा टप्पा गाठेल आणि जो हरेल त्याचे भवितव्य शेवटच्या साखळी सामन्यावर निश्चित होईल.
लढतीचा वेगवान आढावा
अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत आणखी एक गोल्डन चान्स मिळूनही संजू सॅमसनने फक्त 22 धावा केल्या, पण त्या अवघ्या 8 चेंडूंत 3 षटकार आणि एका चौकारासह केल्या.
इशानने तुफानी फलंदाजी करताना योहान्सन स्मितच्या एका षटकात सलग चार षटकार आणि 1 चौकार खेचत 28 धावा वसूल केल्या. 20 चेंडूंत पन्नाशी गाठणाऱ्या इशानने 24 चेंडूंत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा ठोकल्या.
7 षटकांत 104 धावा करणाऱ्या हिंदुस्थानने पुढील पाच षटकांत केवळ फक्त 20 धावा केल्या; पण त्यानंतर हार्दिक पंडय़ाच्या 52 धावांच्या घणाघाताने संघाला द्विशतकापार नेले.
हिंदुस्थानने शेवटच्या 4 षटकांत फक्त 25 धावा काढल्या आणि पाच फलंदाज गमावले. शेवटच्या 9 चेंडूंत 5 फलंदाज केवळ 4 धावांत बाद झाले.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरासमसने 20 धावांत 4 विकेट घेत हिंदुस्थानला 209 धावांवर रोखले.
हिंदुस्थानप्रमाणे नामिबियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. 9 षटकांत 2 बाद 85 अशा सुस्थितीत असलेला नामिबियाचा डाव 116 धावांवर आटोपला. 10 षटकांत 30 धावांत 8 फलंदाज गमावले.
Comments are closed.