T-20 World Cup – फायनल बघणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी विशेष ट्रेन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी 8 मार्च रोजी टी-20 विश्वचषकाचा फायनल सामना होत आहे. फायनलमध्ये सहभागी होणाऱ्या क्रिकेट चाहत्यांना सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई/पुणे आणि अहमदाबाद दरम्यान चार विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे.

अहमदाबादला फायनल पाहण्यासाठी जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी-अहमदाबाद-सीएसएमटी एसी सुपरफास्ट स्पेशल गाड्या चालवणार आहे. 7 मार्च 2026 रोजी रात्री 22.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून एसी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 9 मार्च 2026 रोजी सकाळी 4.00 वाजता एसी सुपरफास्ट गाडी अहमदाबादहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.55 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. दादर, ठाणे, वसई रोड, सुरत आणि वडोदरा या ठिकाणी गाडीला थांबा देण्यात येईल.

पुण्याहून अहमदाबादला फायनल बघायला जाणाऱ्यांसाठी पुणे-अहमदाबाद-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडी सोडण्यात येईल. पुण्याहून 7 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुपरफास्ट स्पेशल गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता अहमदाबादला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी अहमदाबादहून 9 मार्च 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12.10 वाजता पुण्यात पोहोचेल. या गाड्यांना लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत आणि वडोदरा येथे थांबा देण्यात येईल.

या विशेष गाड्यांचे बुकिंग 7 मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. अनारक्षित कोचचे तिकीट सामान्य भाड्याने यूटीएस प्रणालीद्वारे खरेदी करता येईल.

Comments are closed.