क्रिकेटप्रेमींनो तयार व्हा! सुपर 8चा थरार शनिवारपासून, पाहा टीम इंडियाचा पहिला सामना कधी?

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. क्रिकेट चाहत्यांना गट टप्प्यात २० संघांमधील ४० सामने पाहण्याची संधी मिळाली, तर यादरम्यान दोन धक्कादायक उलटफेरही घडल्या. झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून चाहत्यांना एक थरार दिला. १२ संघांचा प्रवास गट टप्प्यात थांबला, तर उर्वरित आठ संघ सुपर ८ फेरीत दाखल झाले.

सुपर ८ फेरीत ८ संघ १२ सामने खेळतील. ही फेरी २१ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान होणार आहे. संघांना ४-४ अशा दोन गटात विभागण्यात आले आहे आणि प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर ३ संघांविरुद्ध १-१ सामना खेळेल. या फेरीत, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

गट अ: टीम इंडिया, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका
गट ब : श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड

सुपर ८ मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना रविवार, २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल. त्यानंतर, दुसरा सामना २६ फेब्रुवारी रोजी आणि तिसरा सामना १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला जाईल.

गट अ मधील सर्व संघांनी गट टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टीम इंडियाने अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव केला, वेस्ट इंडिजने स्कॉटलंड, इंग्लंड, नेपाळ आणि इटलीचा पराभव केला, झिम्बाब्वेने ओमान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा पराभव केला, तर दक्षिण आफ्रिकेने कॅनडा, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि युएईचा पराभव केला. आयर्लंडविरुद्ध झिम्बाब्वेचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

सुपर ८ फेरीतील प्रत्येक सामना निर्णायक असेल, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना खऱ्या अर्थाने उत्साह आणि रोमांच अनुभवायला मिळेल.

Comments are closed.