शुबमन गिल कर्णधार.., टी-20 वर्ल्ड कपमध्ये न निवडलेल्या खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन! ही 11 नावे पाहून व्हाल चकित

2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत होणार असून, शनिवारी बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील या 15 सदस्यीय संघात ईशान किशनचे पुनरागमन झाले आहे, तर खराब फॉर्ममुळे उपकर्णधार शुबमन गिलला डच्चू देण्यात आला आहे.
मजेची गोष्ट अशी की, जे खेळाडू या वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकले नाहीत, त्यांचीही एक अशी प्लेइंग इलेव्हन (Playing 11) तयार होऊ शकते, जी जगातील कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवते. यावरूनच भारतीय क्रिकेटची ताकद किती मोठी आहे, हे लक्षात येते.

संघात स्थान न मिळालेल्या या खेळाडूंच्या टीमचे नेतृत्व शुबमन गिल करू शकतो. त्याच्यासोबत सलामीला स्फोटक फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) असू शकतो. मधल्या फळीत अनुभवी केएल राहुल, जितेश शर्मा आणि यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतचा समावेश होऊ शकतो.

अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी या संघाला बळकटी देऊ शकतात. फिरकीची धुरा अनुभवी युझवेंद्र चहल आणि रवि बिश्नोई सांभाळू शकतात. विशेष म्हणजे, चहलसारखा अनुभवी खेळाडू सध्या मुख्य संघात पुनरागमन करू शकलेला नाही.
वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज ही अनुभवी जोडी असेल. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या मते, सिराजने तयार राहायला हवे, कारण मुख्य संघातील एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास सिराजला पहिली पसंती मिळू शकते.

संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंची ‘बलाढ्य’ प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल, जितेश शर्मा, ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Comments are closed.