टी20 वर्ल्ड कप 2026साठी ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय; दोन खेळाडूंना देण्यात आली मोठी जबाबदारी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2026 च्या टी-20 विश्वचषकाबाबत मोठी घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने स्पर्धा सुरू होण्याच्या सहा महिने आधी सांगितले आहे की, आगामी टी-20 विश्वचषकासाठी त्याचे सलामीवीर कोण असतील. मार्शने सांगितले की, तो ट्रॅव्हिस हेडसोबत विश्वचषकात डावाची सुरुवात करेल. हेडने 11 महिन्यांपासून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मार्शचे विधान ऐकल्यानंतर, असे म्हणता येईल की त्याच्या संघाने टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकानंतर डेव्हिड वॉर्नर निवृत्त झाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाने टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये अनेक सलामीवीरांना आजमावले आहे. यामध्ये मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि जेक फ्रेझर-मॅकगर्कसह कर्णधार मिचेल मार्श यांचा समावेश आहे. परंतु त्यापैकी कोणीही त्या भूमिकेत बसू शकलेले नाही. दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकाबाबत मिचेल मार्श म्हणाला की, येत्या काळात मी आणि हेडी (ट्रॅव्हिस हेड) डावाची सुरुवात करू. अर्थात, आम्ही खूप एकत्र खेळलो आहोत, आमचे संबंध खूप चांगले आहेत, म्हणून आम्ही सुरुवात करू.

यादरम्यान, मिचेल मार्शने वेस्ट इंडिजविरुद्ध 37 चेंडूत विक्रमी शतक ठोकणाऱ्या फिनिशर टिम डेव्हिडच्या भूमिकेबद्दलही बोलला. मार्श म्हणाला, आम्ही याबद्दल बोललो आहोत. आम्ही वेस्ट इंडिजमध्ये पाहिले की तो पूर्वी नियमितपणे फलंदाजीला येत असे. तो यासाठी तयार आहे. तो जितक्या जास्त चेंडूंना तोंड देईल तितकेच तो आमच्यासाठी अधिक सामने जिंकवून देईल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ 10 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 7 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे. टी-20 मालिकेनंतर, दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाईल. मालिकेतील पहिला टी-20 सामना डार्विनच्या मारारा क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.

टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

मिशेल मार्श (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, एडम झांपा

Comments are closed.