बांग्लादेशबाबत आयसीसीचा मोठा निर्णय, बीसीबीच्या अडचणीत वाढ?
आगामी टी२० विश्वचषकातून बांग्लादेशने माघार घेतली असून त्याचे परिणाम त्यांच्या पत्रकारांना भोगावे लागण्याची शक्यता आहे. बांग्लादेशमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी) स्पर्धेत सहभागी खेळ पत्रकारांबाबत अधिक विचार करत आहे. यासाठी ज्या पत्रकारांनी त्यांचा सहभाग नोंदवला त्यातील बांग्लादेशच्या पत्रकारांना अधिक संधी न देण्याच्या विचारात आयसीसी आहे.
“सध्या स्पर्धेत संघबदल झाले असून त्यानुसार वेळापत्रकात बदल झाला आहे. त्यामुळे पत्रकारांच्या मान्यतेबाबतही (ऍक्रिडेशन) योग्य निर्णय घ्यावे लागतील”, असे आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले.
“या स्पर्धेसाठी बांग्लादेशच्या जवळपास ८०-९० पत्रकारांनी मान्यतेसाठी नोंद केली आहे. त्यांचा संघ या स्पर्धेत खेळत नसला तरी त्या सगळ्या पत्रकारांना मान्यता देणे शक्य नाही. जर प्रत्येक देशाच्या कोट्याप्रमाणे पाहिले तर ४० पेक्षा अधिक पत्रकारांना संधी देता येत नाही”, ही अधिकची माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली आहे.
बांग्लादेशच्या पत्रकारांच्या या अडचणीबाबत बांग्लादेश क्रिकेट बोर्डचे (बीसीबी) मीडिया मॅनेजर अमजद होसैन यांनी आयसीसीला प्रश्न विचारला आहे. “हा निर्णय आम्हाला काल समजला आणि त्याबाबत अधिक जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा महत्वाचा विषय असून ते का केले गेले?”, असे त्यांनी ढाकामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
आता बांग्लादेशच्या मीडियाला स्पर्धेसाठी पुन्हा एकदा मान्यता मिळण्यासाठी सहभाग नोंदवावा लागेल. “मी ८ ते ९ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये कव्हर केल्या आहेत. आता पहिल्यांदाच माझी मान्यता रद्द झाली आहे. बीसीबीच्या निर्णयानंतर आम्ही पुन्हा एकदा नोंदणी करू”, असे बांग्लादेशचे वरिष्ठ पत्रकार म्हणाले.
असुरक्षततेच्या कारणामुळे बांग्लादेशने टी२० विश्वचषकाचे सामने भारतात खेळण्यास मनाई केली होती. त्यानंतर आयसीसीने त्यांच्या खेळाडूंसाठी भारत सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता, मात्र तरीही त्यांनी माघार घेतली. त्यांच्याजागी या स्पर्धेत स्कॉटलंड खेळणार असून त्यांनी संघही जाहीर केला आहे.
फेब्रुवारी ७ पासून ही स्पर्धा सुरू होणार असून पहिला सामना पाकिस्तान-नेदरलॅंड्स यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताबरोबर श्रीलंकेलाही मिळाले आहे.
Comments are closed.