बांगलादेशचा उद्धटपणा! आयसीसीच्या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला व्हिसा नाकारला; टी-20 वर्ल्ड कपवरून वाद सुरूच

2026 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेश क्रिकेट संघाने भारतात येण्यास नकार दिला असून, आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे. भारत आणि श्रीलंका (India & Shrilanka) या स्पर्धेचे संयुक्त यजमान आहेत. स्पर्धा सुरू व्हायला आता केवळ 20 दिवस उरले असताना, वेळापत्रकात बदल करणे आयसीसीसाठी अत्यंत कठीण झाले आहे.

या वादावर तोडगा काढण्यासाठी आयसीसीचे दोन मोठे अधिकारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी (BCB) चर्चा करण्यासाठी ढाका येथे जाणार होते. मात्र, बांगलादेशने यामध्येही अडथळा आणला. त्यांनी आयसीसीच्या एका भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला व्हिसा देण्यास उशीर केला, ज्यामुळे केवळ एकच अधिकारी ढाका पोहोचू शकला.

आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे आणि सुरक्षा प्रमुख अँड्र्यू एफग्रेव्ह एकटेच ढाका येथे पोहोचले. ते तिथे बीसीबी आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील.

आयसीसी अधिकारी बांगलादेशला एक सविस्तर ‘सुरक्षा प्लॅन’ सादर करणार आहेत, ज्यामध्ये भारतीय भूमीवर बांगलादेशचा संघ पूर्णपणे सुरक्षित कसा असेल, हे पटवून दिले जाईल. बांगलादेशमध्ये दोन हिंदू तरुणांच्या हत्येच्या घटनेनंतर भारतात संताप व्यक्त करण्यात आला होता. याचे पडसाद आयपीएलवरही उमटले. बीसीसीआयने ‘केकेआर’ला बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजुर रहमानला रिलीज करण्यास सांगितले, ज्यानंतर बांगलादेशने त्यांच्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली. आता बीसीबीने सुरक्षेचे कारण देत भारतात खेळण्यास नकार दिला आहे.

Comments are closed.