ENG vs SCO: स्कॉटलंडला हरवून इंग्लंडच्या सुपर-8 च्या आशा जिवंत; टॉम बँटन विजयाचा खरा हिरो

टी-20 वर्ल्ड कपच्या 23 व्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडचा 5 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्कॉटलंडने विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य दिले होते, जे इंग्लंडने 18.2 षटकांत पूर्ण केले.
153 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती, 13 धावांवर त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद झाले होते. मात्र, टॉम बँटनने नाबाद 63 धावांची (4 चौकार, 3 षटकार) खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने जॅकब बेथेलसोबत (32 धावा) 66 धावांची महत्त्वाची भागीदारी केली.
प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडचा संघ 19.4 षटकांत 152 धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून कर्णधार रिची बेरिंग्टनने सर्वाधिक 49 धावा केल्या, तर मायकेल जोन्सने 33 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशिदने 3 विकेट्स घेतल्या, तर जोफ्रा आर्चर आणि लियाम डॉसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
या विजयासह इंग्लंडचा संघ 3 सामन्यांत 4 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यांचा शेवटचा सामना इटलीविरुद्ध आहे; तो जिंकल्यास त्यांचे सुपर-8 मधील स्थान जवळपास निश्चित होईल. स्कॉटलंडचे 3 सामन्यांत केवळ 2 गुण असून त्यांचा पुढचा प्रवास कठीण झाला आहे. त्यांना आता नेपाळविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल आणि इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
Comments are closed.