आणखी एक फायनल अहमदाबादेत, आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्येही मोदी स्टेडियमलाच झुकते माप

पुन्हा एकदा अहमदाबादच्या मोदी स्टेडियमला वर्ल्ड कपच्या फायनलसाठी झुकते माप देण्यात आले आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामनाही मोदी स्टेडियमवरच खेळला जाणार आहे. फक्त दुर्दैवाने पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर फायनल कोलंबोत खेळविली जाऊ शकते. पण सध्या पाकिस्तानी क्रिकेटची झालेली दुर्दशा पाहता ते अंतिम फेरी पोहोचण्याची शक्यता कमीच आहे.

हिंदुस्थानने गेल्या वर्षी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बाजी मारली होती.  त्यामुळे हिंदुस्थानी संघाला घरच्या मैदानावर जगज्जेतपदाची पुनरावृत्ती करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालीय. या स्पर्धेच्या कार्यक्रमावर आयसीसीने अधिकृत  शिक्कामोर्तब केले नसले तरी 7 फेब्रुवारी ते 6 मार्चदरम्यान हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील सात क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटची पंढरी खऱ्या अर्थाने मुंबई असली तरी सध्या मुंबईचे क्रिकेटमधील वर्चस्व कमी करण्याचे जोरदार प्रयत्न केले काही वर्षे केले जात आहे. त्यामुळे 2023 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डचा अंतिम सामना अहमदाबादलाच खेळविला गेला होता. तसेच आयपीएलच्या अंतिम लढतीही त्याच ठिकाणी खेळविल्या जात आहेत. त्यामुळे वानखेडे आणि कोलकाता हे दोन्ही स्टेडियम आपोआप अंतिम लढतीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेली आहेत.

सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय परिस्थिती तणावाखाली असल्यामुळे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळणार आहेत. परिणामतः या स्पर्धेत पाकिस्तानच्या लढती कोलंबोत खेळविल्या जाणार आहेत. हिंदुस्थानही पाकिस्तानात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडलवर खेळला होता. या स्पर्धेचा अंतिम सामनाही लाहोरला खेळविला जाणार होता, मात्र अंतिम सामन्यात हिंदुस्थान पोहोचल्यामुळे तो दुबईत खेळविला गेला. अशीच स्थिती पाकिस्तानच्या जबरदस्त खेळामुळे उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी अंतिम फेरीसाठी दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. अंतिम फेरी पाकिस्तानने गाठली तर मोदी स्टेडियमला ही लढत गमवावी लागेल.

Comments are closed.