ICC कडून टी 20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना बक्षीस जाहीर, भारताला 25 कोटी मिळणार, पाकला किती?

नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद मिळवलं. भारतानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा  विजेतेपद मिळवलं. भारतानं आतापर्यंत तीनवेळा टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. 2007, 2024 आणि 2026 मध्ये भारतानं विजेतेपद मिळवलं आहे. आयसीसीनं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बक्षीसाची रक्कम जाहीर केली आहे. भारतानं विजेतेपद मिळवल्यानं भारताला 2,639,423 अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 25 कोटी रुपये मिळाले आहेत. तर, उपविजेत्या  न्यूझीलंडला 14,22,692 अमेरिकन डॉलर म्हणजेच 13 कोटी रुपये मिळाले आहेत.

पाकिस्तानला किती रुपये मिळाले?

उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला अनुक्रमे 9.24 कोटी रुपये आणि 8.96 कोटी रुपये मिळाले आहेत.वेस्ट इंडिजचं आव्हान  सुपर 8 मध्ये संपलं होतं. वेस्ट इंडिजला 538269 अमेरिकन डॉलर मिळाले आहेत.

पाकिस्ताननं त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. पाकिस्तानला 5,22,692 अमेरिकन डॉलर म्हणजेच 4.80 कोटी  मिळाले आहेत. झिमाब्बेनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता, त्यांना 491538 अमेरिकन डॉलर्स आणि श्रीलंकेला 4,75,962 अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत.

सुपर 8 मध्ये प्रवेश न करु शकलेल्या अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेला प्रत्येकी 3,09,808 अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत. स्कॉटलँडला 2,78,654 अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत. आयरलँडला 2,71,731  डॉलर्स मिळाले आहेत. इटली, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळला 2,56,154 अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत. कॅनडा, नामीबिया आणि ओमानला प्रत्येकी 2,25,000 अमेरिकन डॉलरची रक्कम प्राईज मनी म्हणून देण्यात आली आहे. आयसीसीनं ही रक्कम प्राईज मनी म्हणून खेळाडूंना आर्थिक मदत करण्यासाठी आणि क्रिकेटच्या विकासासाठी दिलं आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं न्यूझीलंडला पराभूत करत तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. संजू सॅमसननं शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी केल्यानं त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाला. भारतानं सलग दोन वेळा टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं आहे.

भारताला पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात मिळाला होता. त्यानंतर 17 वर्षानंतर भारतानं रोहित शर्माच्या नेतृत्त्वात 2024 मध्ये विजेतेपद मिळालं. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं 2026 मध्ये न्यूझीलंडला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.