T20 WC26: अर्शदीप सिंगवर होणार आयसीसीची कारवाई? फायनलमध्ये न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला मारला होता चेंडू

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा इतिहास रचला. रविवारी (८ मार्च) अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. याबरोबरच भारत घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला.
भारताने धमाकेदार विजय मिळवल्यानंतर सर्वत्र त्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्या अंतिम सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने केलेली एक चूक त्याला महागात पडू शकते. त्याने सामन्याच्या दुसऱ्या षटकात आक्रमकपणे न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलकडे चेंडू फेकला. तो चेंडू थेट मिचेलच्या खांद्याला लागला, त्यानंतर मैदानावरील वातावरण काही काळ तापलेले दिसले.
चेंडू लागल्यावर मिचेल खूप नाराज दिसला. अर्शदीप आणि त्याच्यात काही काळ वादही झालेला दिसला. तेव्हा भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मध्यस्ती केली आणि स्थिती सांभाळली. आता या घटनेमुळे अर्शदीपने आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या २.९ नियमांचे उल्लंघन केल्याचे कळते. या नियमानुसार कोणताही खेळाडू दुसऱ्या खेळाडूकडे किंवा फलंदाजाकडे चेंडू किंवा अन्य वस्तू फेकत असले तर ते खेळ भावनेच्या विरुद्ध मानले जाते. आता आयसीसी अर्शदीपवर कोणता निर्णय घेते याकडे लक्ष असेल.
ही घटना स्तर-१ मध्ये येते. त्यामुळे अर्शदीपवर सामन्याची ५० टक्के फी कपात आणि त्याच्यावर एक किंवा २ डिमेरिट पॉइंट मिळण्याची शक्यता आहे.
सामना संपल्यानंतर अर्शदीपने डॅरिलची माफी मागितली. डॅरिलनेही हसत त्याचा स्विकार केला, मात्र तरीही आयसीसी याची दखल घेण्याची शक्यता आहे.
अशीच घटना मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये घडली होती. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडन सिल्स याची आयसीसीने फि कपात केली होती. त्याने भारतीय फलंदाज यशस्वी जायसवालच्या दिशेने चेंडू फेकला होता. ही घटना पाहता अर्शदीपवरही आयसीसी काय ऍक्शन घेते किंवा नाही हे काही दिवसांत कळेलच.
Comments are closed.